तडका : पैशांचा महापूर

तडका : पैशांचा महापूर

एकंदरीत सध्या देशात धनलक्ष्मीचे राज्य आलेले आहे, असे मानायला हरकत नाही. तुमच्या-आमच्यासारखे सामान्य लोक सोडले, तर सर्व लोकांकडे प्रचंड प्रमाणात पैसा आहे. देशभर सर्वत्र पैसाच पैसा वाहतो आहे, असे दिसेल. आपल्यासारखे सामान्य लोक महिनाअखेरीला गोडेतेल कसे पुरेल, या विवंचनेत असतात. संसार सांभाळण्याची तारेवरची कसरत सुरू असते; पण त्याच वेळेला जागोजागी सापडणारे पैसे पाहून आपण सर्द किंवा चकित होतो.

कुणी एक तहसीलदार महिला लाच स्वीकारताना पकडली जाते. या लाचेची रक्कम दोन ते तीन लाख रुपये असते. कुणी एक महिला तलाठी फेरफार प्रकरणात लाख रुपयांची लाच घेताना पकडली जाते. कुणी अगरवाल नावाच्या बिल्डरची कार दोन कोटी रुपयांची असते. त्याच्या मुलाचे अवघ्या 90 मिनिटांचे हॉटेलचे बिल 48 हजार रुपये असते. 48 हजार रुपये अवघ्या दीड तासात उडवणार्‍या त्या मुलाचे कौतुक वाटते; कारण ही रक्कम म्हणजे आपले दोन महिन्यांचे बजेट असते. डाळ भरायला घेतली तर साखर संपते आणि साखरेची भरती करायला घ्यावी तर गोडेतेल संपते, अशी अवस्था असणार्‍या आपल्यासारख्या लोकांना काही तासांत हजारो रुपये उधळणार्‍या लक्ष्मीपुत्रांचे कौतुकच वाटणार, यात शंका नाही.

विविध शासकीय यंत्रणा पैशांच्या व्यवहारावर लक्ष ठेवून असतात. कर चुकवणार्‍या एखाद्या ज्वेलरवर धाड पडली तर सुमारे 30 ते 40 कोटी रुपये नगदी सापडतात. नगदी पैसे ठेवणे धोक्याचे आहे, हे या लोकांना चांगले माहीत असते. त्यामुळे ते प्रॉपर्टीही घेऊन ठेवतात. आपल्याकडे ना नगदी पैसे असतात ना प्रॉपर्टी. कसेबसे आयुष्याच्या उत्तरार्धात एखादे घर, एखादा फ्लॅट एवढीच आपली कमाई असते आणि ती कमाई पुढील पिढीला सोपवून आपल्याला पुढच्या प्रवासाला समाधानाने जायचे असते. काही लोकांची हाव एवढी असते की, ते पुढच्या सात पिढ्यांचे एकाच जन्मात कमावून ठेवतात. साहजिकच पुढच्या पिढीला काही नाही केले तरी आरामात बसून खाता येते.

धाड टाकणार्‍या यंत्रणांची वेगळीच समस्या असते. पैशांचे घबाड सापडले तर सर्वात आधी ते मोजून ठेवावे लागतात. चार-पाच कर्मचार्‍यांची टीम असेल तर ते मोजून-मोजून किती पैसे मोजणार? पन्नास हजार, एक लाख, फार तर फार पाच लाख. तीस कोटी सापडले असतील तर ते मोजण्यासाठी आणखी माणसे बोलवावी लागतात. नोटा मोजणार्‍या मशिन मागवाव्या लागतात, तेव्हा कुठे दिवसभरात रोकड किती सापडली, याचा ताळमेळ लागत असतो.

काही धाडींमध्ये जे पैसे सापडतात ते एकाच घरामध्ये विविध ठिकाणी ठेवलेले असतात. याचा अर्थ या कर्तृत्ववान लोकांनी इतकी कमाई केली आहे की, पैसे कुठे ठेवावेत, हा त्यांच्यापुढे मोठा प्रश्न आहे आणि त्याच वेळी आहेत ते पैसे कसे पुरवावेत, हा आपल्या पुढील मोठा प्रश्न असतो. घरातील कपाटे भरल्यानंतर त्या बिचार्‍यांनी पैसे ठेवावेत तरी कुठे? बॅगा, गाद्या, उशाच्या खोळी, चपला-बूट ठेवायचे रॅक अशा असंख्य ठिकाणी नोटांच्या नोटा दडवलेल्या दिसतात. अशा घरांमध्ये दीड किलो, दोन किलो सोने सापडते. महिलांच्या अंगावर शंभर-दीडशे तोळ्यांचे दानिने असतात. इथे आपली बायको जुने मंगळसूत्र काढून नवे गाठवलेले मंगळसूत्र घ्या म्हणून गेली दोन वर्षे मागे लागलेली असते; पण आपली आर्थिक परिस्थिती पाहता आपण त्याकडे दुर्लक्ष करत असतो.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news