नाशिक : पुढारी वृत्तसेवा – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षांचा निकाल सोमवारी (दि. २७) दुपारी 1 वाजत ऑनलाइन जाहीर होणार आहे.
राज्य शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२४ मध्ये घेतलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या अधिकृत पोर्टलवर सोमवारी दुपारी १ वाजता जाहीर करण्यात येणार आहे. दरवर्षी साधारणत: जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दहावीचे निकाल जाहीर होतात. परंतु, यंदा प्रथमच मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात निकाल जाहीर होत आहे. सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय मिळालेले गुण संबंधित संकेतस्थळावर दिसणार आहेत. त्याच्या निकालाची, गुणांची माहिती असेलेली संगणकप्रत (प्रिंट आउट) विद्यार्थ्यांना घेता येणार आहे.
सोमवारी ऑनलाइन निकाल जाहीर होताच मंगळवारी (दि. २८) विद्यार्थ्यांना स्वत:च्या अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकेच्या छायाप्रती पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या http://verification.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावरून स्वत: किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दि. २८ मे ते ११ जून या कालावधीत गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत.
विद्यार्थ्यांना अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज भरून दहावी परीक्षा उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनाच्या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायापत्र घेणे विद्यार्थ्यांना अनिवार्य असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना आपल्या निकालानंतर उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करायचे आहे, त्यांनी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा, असे आवाहन राज्य मंडळाने केले आहे. जुलै-ऑगस्टमध्ये होणाऱ्या दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी आणि श्रेणीनुसार विद्यार्थ्यांचे ३१ मे पासून मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज भरून घेतले जातील.
हेही वाचा: