पुणे : परवाना न मिळाल्याने यकृत प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत 15 रुग्ण | पुढारी

पुणे : परवाना न मिळाल्याने यकृत प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत 15 रुग्ण

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पाहणी पथकाची भेट, सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता असे सर्व सोपस्कार पूर्ण होऊनही यकृत प्रत्यारोपण परवान्याचे नूतनीकरण झालेले नाही. त्यामुळे ससून रुग्णालयात 15 रुग्ण गेल्या सहा महिन्यांपासून यकृत प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहेत. ससून रुग्णालयाचा यकृत प्रत्यारोपणाचा परवाना फेब्रुवारी महिन्यात संपुष्टात आला. त्यानंतर लगेचच परवाना नूतनीकरणासाठी अर्ज करण्यात आला. महिनाभरात संचालनालयाच्या पथकाने रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. पथकाच्या सूचनांनुसार सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यात आली. मात्र, अजूनही नूतनीकरण झालेले नाही.

ससून सर्वोपचार रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेसाठी दीड लाख रुपयांपर्यंतचा खर्च मिळतो. आता ही मर्यादा पाच लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. खासगी रुग्णालयांच्या तुलनेत शासकीय रुग्णालयांमध्ये कमी खर्चामध्ये प्रत्यारोपण होते. त्यामुळे रुग्णांकडून उपचारांसाठी विचारणा केली जाते. गेल्या सहा महिन्यांपासून 15 रुग्णांची यादी यकृत प्रत्यारोपणाचा परवाना न मिळाल्याने प्रलंबित आहे.

परवान्याची मुदत संपण्याच्या सहा महिने आधीच नूतनीकरणासाठी अर्ज केला होता. दर पाच वर्षांनी परवान्याचे नूतनीकरण करावे लागते. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय, आरोग्य सेवा संचालक आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या पथकाने रुग्णालयाला भेट दिली. सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यात आली आहे. पुढील दहा-पंधरा दिवसांमध्ये परवानगी मिळण्याची शक्यता आहे.
         – डॉ. किरणकुमार जाधव, समन्वयक, यकृत प्रत्यारोपण, ससून रुग्णालय. 

हेही वाचा :

जालना घटनेला न्याय मिळेल; देवेंद्र फडणवीसांनी मनोज जरांगे पाटलांना चर्चेसाठी बोलावले

पुणे : वर्गणी दिली नाही म्हणून बांबूने मारहाण

 

Back to top button