एआय रोबोटिक सर्जरीमुळे शक्य होणार मेंदूचे प्रत्यारोपण! | पुढारी

एआय रोबोटिक सर्जरीमुळे शक्य होणार मेंदूचे प्रत्यारोपण!

न्यूयॉर्क : अमेरिकन स्टार्टअप ब्रेनब्रिजने आर्टिफिशियल इंटेलिजेन्सवर (एआय) आधारित रोबोटिक शस्त्रक्रियेची संकल्पना जाहीर करत आशा-अपेक्षांचे नवे दालन खुले केले आहे. अ‍ॅडव्हान्स न्युरोसायन्स व बायोमेडिकल इंजिनिअरिंग क्षेत्रात कार्यरत असलेल्या ब्रेनब्रिज या तंत्राच्या माध्यमातून व्हिडीओ शेअर केला गेला असून, त्यात मेंदूचे प्रत्यारोपण कशा पद्धतीने होऊ शकते, याचे सादरीकरण केले आहे.

हा व्हिडीओ जवळपास आठ मिनिटांचा असून, एका यूट्यूब चॅनेलवर तो पोस्ट केला गेला आहे. सदर चॅनेलवर विज्ञान आणि विज्ञानाशी संबंधित नवनव्या क्रांतीवर प्रकाशझोत टाकला जातो. ब्रेनब्रिज ही जगातील पहिली मेंदू प्रत्यारोपणाची प्रणाली असून, या माध्यमातून अ‍ॅडव्हान्स रोबोटिक्स व आर्टिफिशियल इंटेलिजेन्सच्या माध्यमातून मेंदूचे प्रत्यारोपण केले जाते. सदर संकल्पना मूर्त स्वरूपात उतरवता आल्यास स्टेज-4 कॅन्सर, लकवा, अल्झायमर व पार्किन्सनसारख्या न्युरोडीजेनेरेटिव्ह आजारांपासून कायमची मुक्तता मिळू शकते.

सदर मेंदूच्या प्रत्यारोपणानंतर काही दिवसातच ती व्यक्ती सामान्य आयुष्य व्यतीत करू शकेल. मेंदूचे प्रत्यारोपण केले जात असले, तरी त्या व्यक्तीच्या जुन्या आठवणी, जुन्या सवयी, बौद्धिक कौशल्ये जशीच्या तशी राहतील, असा या स्टार्टअपचा दावा आहे. या शस्त्रक्रियेची सुरुवात डोनर व रिसिव्हर या उभयतांनाही भूल देऊन होईल. उभयतांनाही यावेळी ट्रेकियोटॉमीच्या माध्यमातून यांत्रिक श्वसन दिले जाईल, जेणेकरून सर्व अवयव सक्रिय असतील.

दोघांच्या शरीरात आर्टिफिशियल प्लाझ्मा सॉल्युशन टाकले जाईर. यामुळे रक्ताच्या गुठळ्या होणार नाहीत आणि पुरेसा ऑक्सिजन मिळत राहील. सर्जिकल आर्मच्या माध्यमातून उर्वरित मुख्य शस्त्रक्रियेचे टप्पे पूर्ण केले जातील आणि ते पूर्ण झाल्यानंतर जवळपास 4 आठवडे शरीर कोमात ठेवले जाईल. या कालावधीत शरीर व डोके एकमेकांशी पूर्ववत जुळतील, असा उद्देश असेल. ब्रेनब्रिजची ही संकल्पना यशस्वी झाल्यास, मनुष्य अनेक मोठ्या आव्हानांवर सहज मात करू शकेल, असा सध्याचा होरा आहे.

Back to top button