आंबेठाण येथे पुलासह रस्त्याच्या कामाने वाहतूक कोंडी फुटली | पुढारी

आंबेठाण येथे पुलासह रस्त्याच्या कामाने वाहतूक कोंडी फुटली

भामा आसखेड(पुणे); पुढारी वृत्तसेवा : ‘सरकारी काम अन् वर्षभर थांब’ अशी एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. एखादे सरकारी काम मंजूर झाल्यावर ते कधी मार्गी लागेल, याचा भरवसा नसतो. परंतु, खेडच्या एमआयडीसी क्षेत्रातील आंबेठाण गावच्या बाह्यवळण मार्ग रस्त्यावरील पुलासह रस्त्याचे रखडलेले काम केवळ एकाच आठवड्यात सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ पूर्ण केले. त्यामुळे दररोजच होणार्‍या वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा मिटला आहे.

चाकण ते आंबेठाण-करंजविहिरे-गडद-वांद्रा हा प्रमुख जिल्हामार्ग आहे. एमआयडीसी टप्पा क्रमांक-2 क्षेत्रातून हा मार्ग गेल्याने वाहतुकीसाठी महत्त्वाचा आहे. चाकण ते करंजविहिरे यादरम्यान रस्त्याचे काम शासनाच्या हायबि—ड अ‍ॅन्युटीअंतर्गत मंजूर होऊन रस्ता सिमेंट क्राँक्रीटने झाला. परंतु, आंबेठाणच्या हद्दीत रस्ता नेमका जागेच्या मालकी वादाने काही मीटर रखडला होता. ठेकेदाराने तेवढा जागेचा रस्ता सोडून अन्य रस्त्याचे काम पूर्ण केले. रखडलेल्या रस्त्याला खड्डे पडून व त्यात पाणी साचून अवजड वाहने व प्रवासी वाहनाने आंबेठाणला नित्याचीच वाहतूक कोंडी व्हायची.

वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिस येथे ड्युटीला असत. वाहतुकीसाठी हा रस्ताच धोकादायक झाला. या रस्त्याचे काम मार्गी लागावे म्हणून अनेक गावांच्या नागरिकांसह प्रवाशांचीही मागणी होती. येथील वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी म्हणून काही लोक अन्य लांबच्या मार्गाने ये-जा करीत होते.

दरम्यान, जागेचा वाद मिटला आणि चाकण सार्वजनिक बांधकाम विभागाने पोलिस बंदोबस्तात एकाच आठवड्यात पुलासह रस्त्याचे रखडलेले काम मार्गी लावले. नागरिकांनी वाहतूक कोंडीतून सुटका झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित ठेकेदाराने लवकर काम केल्याबद्दल कौतुक केले.

हेही वाचा

कमला एकादशीनिमित्त आळंदीत भाविकांची गर्दी

‘हर घर तिरंगा’ अंतर्गत टपाल विभागातर्फे रॅलीतून जागृती

पिंपरी : मोरवाडीतील दिव्यांग भवनाचा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला जाणार

Back to top button