पिंपरी : मोरवाडीतील दिव्यांग भवनाचा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला जाणार | पुढारी

पिंपरी : मोरवाडीतील दिव्यांग भवनाचा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला जाणार

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने मोरवाडी, पिंपरी येथे चार मजली दिव्यांग भवन उभारण्यात आले आहे. त्या भवनाचा प्रोजेक्ट रिपोर्ट (प्रकल्प अहवाल) तयार करण्यात येणार आहे. या भवनाच्या इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. हे बांधकाम 24 हजार चौरस फूट क्षेत्रफळात आहे. भवनात फर्निचर व वीजपुरवठा जोडणीचे काम पूर्ण झाले आहे. भवनाचा प्रोजेक्ट रिपोर्ट करण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी 20 जूनच्या बैठकीत दिली होती. दिव्यांग भवनाचे संचालन करण्यासाठी दिव्यांग भवन फाउंडेशन कंपनी नावाने स्वतंत्र कंपनी स्थापन करण्यात आली आहे. त्याद्वारे या भवनाचे कामकाज चालणार आहे.

दिव्यांग भवन फाउंडेशन कंपनीचे सचिव गिरीष परळीकर यांनी प्रोजेक्ट रिपोर्टची तयारी दर्शविली आहे. त्यासाठी 2 लाख 50 हजारांचा खर्च अपेक्षित आहे. या रिपोर्टमध्ये इमारतींसह विविध विभागांची माहिती असणार आहे. तो रिपोर्ट 15 दिवसांत पूर्ण केला जाणार आहे. दरम्यान, भवनासाठी आवश्यक असलेली साधने खरेदी करण्यात आली आहे. त्यासाठी 9 लाख 221 खर्च करण्यात आला आहे. या दोन्ही खर्चास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीची मान्यता दिली आहे.

दहा सुरक्षारक्षक नियुक्त
दिव्यांग भवनाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तेथे स्थापत्य व विद्युतविषयक कामे सुरू आहेत. या इमारतीच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळाचे 10 सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहेत. त्यांना दरमहा 30 हजार 908 रुपये वेतन दिले जाणार आहे. दोन वर्षांसाठी एकूण 74 लाख 17 हजार 920 रुपये खर्च आहे. त्यास आयुक्त शेखर सिंह यांनी स्थायी समितीची मान्यता दिली आहे.

हेही वाचा :

महापालिका निवडणुकीत आठ जागांची मागणी : आठवले

ठाणे पालिकेच्या कळवा रुग्णालयात एक रात्रीत 17 रुग्णांचा मृत्यू

Back to top button