राजकारणात देव, धर्म आणणार्‍या भाजपला सत्तेतून हद्दपार करा | पुढारी

राजकारणात देव, धर्म आणणार्‍या भाजपला सत्तेतून हद्दपार करा

राशिवडे, पुढारी वृत्तसेवा : राजकारणात देव व धर्माचा आधार घेणार्‍या भारतीय जनता पक्षाला केंद्राच्या सत्तेतून हद्दपार करा, असे आवाहन विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. राशिवडे (ता. राधानगरी) येथे शाहू महाराज यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते कृष्णराव पाटील होते.

वडेट्टीवार म्हणाले, या सरकारला जनतेच्या विकासाचे काहीही पडलेले नाही. सोन्यावर, हिर्‍यावर दोन टक्के आणि शेती अवजारे व बी-बियाण्यांवर अठरा टक्के जीएसटी आकारणार्‍या सरकारला शेतकर्‍यांचे हित करायचेच नाही. त्यांना विकासासाठी नको, तर स्वहितासाठी सत्ता हवी असल्याचे त्यांनी कृतीतून सिद्ध केले आहे. ज्यांच्यावर किरीट सोमय्या

यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. यावरून यांची नीती समजते. भ्रष्टाचार करणार्‍याला बाजूला बसू देणार नाही, असे म्हणणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अजित पवारांच्याच हातात महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या सोपवल्या. भाजपने राजकारणात कसलीही नीतिमत्ता आणि नैतिकता ठेवली नाही. अशा भाजपला सत्तेतून हद्दपार करून सर्वसामान्य जनता या निवडणुकीत नक्की बदला घेईल.

आमदार पी. एन. पाटील म्हणाले, 25 वर्षांनंतर शाहू महाराज यांच्या रूपाने काँग्रेसला उमेदवारी मिळाली आहे. त्यांनी उमेदवारी स्वीकारावी म्हणून दिल्ली व मुंबईमधून नेते मंडळींनी आम्हाला प्रयत्न करण्यास सांगितले. देशाची घटना, लोकशाही धोक्यात आहे हे समजून घेऊन त्यांनी उमेदवारी स्वीकारली. सत्ताधार्‍यांनी कोणतेही विकासाचे प्रकल्प आणले नाहीत, आम्ही मात्र सातत्याने विकासाची कामे केली आहेत. याच भूमिकेतून शाहू महाराजांची उमेदवारी आहे.

ए. वाय. पाटील म्हणाले, सत्ताधारी भाजपला हद्दपार करून इंडिया आघाडीची सत्ता आणूया. तसे नाही झाले तर पुढच्या कुठल्याही निवडणुका होणार नाहीत. आमदार पी. एन. पाटील यांनी आपले नेतृत्व प्रत्येकवेळी सिद्ध केले. शाहू महाराजांना उमेदवारी देताना पी. एन पाटील आणि आमदार सतेज पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. शाहू महाराजांना संसदेत पाठविण्याची संधी तुम्हा-आम्हाला मिळाली आहे.

यावेळी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, जनता दलाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव पाटील, शेकापचे राज्य पदाधिकारी एकनाथ पाटील, भोगावतीचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील आदींची भाषणे झाली. गोकुळ दूध संघाचे माजी संचालक पी. डी. धुंदरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सभेदरम्यान शाहू महाराज यांना भोगावती कारखान्याच्या कामगार युनियनच्या वतीने युनियनचे नेते राऊसाहेब पाटील व पदाधिकारी यांनी पाठिंबा व्यक्त केला.

सभेसाठी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रामचंद्र दळवी, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष कृष्णराव किरूळकर, ‘भोगावती’चे उपाध्यक्ष राजाराम कवडे, ‘गोकुळ’चे संचालक बाळासाहेब खाडे, आर. के. मोरे, अविनाश पाटील, संजय डकरे, सरपंच संजीवनी पाटील, विश्वनाथ पाटील, अशोक साळोखे, बी. के. डोंगळे, बी. आर. पाटील, बाबासाहेब देवकर, भारत पाटील, एल. एस. पाटील, शिवाजीराव पाटील, रवींद्र पाटील, प्रा. सुनील खराडे, सरदार पाटील, दत्तात्रय पाटील, मानसिंग पाटील, उत्तम पाटील, सागर धुंदरे, अशोक पाटील, तानाजी लाड, सम—ाट पाटील आदी उपस्थित होते. एकनाथ चौगले यांनी सूत्रसंचालन केले. सागर धुंदरे यांनी आभार मानले.

Back to top button