पुणे : स्कूल व्हॅन चिखलात रुतली, पोरं ’धक्का’ देऊन थकली! | पुढारी

पुणे : स्कूल व्हॅन चिखलात रुतली, पोरं ’धक्का’ देऊन थकली!

प्रसाद जगताप

पुणे : एकीकडे स्मार्ट शहराचा गवगवा केला जात असताना, दुसरीकडे अपुर्‍या आणि नादुरुस्त रस्त्यांमुळे वाहनचालक आणि नागरिकांचे पुण्यात मोठे हाल होत आहेत. असाच हलगर्जीपणे सुरू असलेल्या कामाचा फटका शालेय विद्यार्थ्यांना बसला असून, बाणेर परिसरात एक चिखलात रुतलेली स्कूल व्हॅन शालेय विद्यार्थ्यांनाच धक्का मारून बाहेर काढावी लागली आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बाणेर परिसरातील पॅनकार्ड क्लब रोड, सर्व्हे नं. 31, 2 ब अथश्री सोसायटीच्या मागील बाजूस असलेल्या रस्त्यावर ही घटना घडली. गुरुवारी (दि. 03) रोजी दुपारी 2 ते अडीचच्या सुमारास घडलेल्या या घटनेचा येथे राहणार्‍या स्थानिक नागरिकांनी या घटनेचा व्हिडीओ काढला आहे. तसेच, येथे असलेल्या रस्त्याच्या समस्येमुळे येथील नागरिक अनेक दिवसांपासून वैतागलेले आहेत. या रस्त्याचे अद्यापपर्यंत डांबरीकरण झालेले नसल्याने पावसात येथील नागरिकांना चिखलातून वाट काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यांनी यासंदर्भात प्रशासनाला अनेकदा तक्रारीदेखील केल्या आहेत. मात्र, त्यांच्या या तक्रारींची प्रशासनाकडून अद्यापपर्यंत दखल घेण्यात आलेली नाही, असे येथील स्थानिक नागरिकांनी दै. ’पुढारी’शी बोलताना सांगितले.

स्ट्रीट लाईटसुद्धा नाहीत

रस्त्याच्या समस्येसोबततच येथील नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यात महत्त्वाचे म्हणजे या भागात अनेक बॅचलर मुली राहण्यास आहेत आणि या भागामध्ये रस्त्यांवर स्ट्रीट लाईटच नाहीत, त्यामुळे मुलींना सायंकाळी 7 वाजल्यानंतर घराच्या बाहेर पडणेदेखील मुश्कील झाले आहे.

ट्वीटरवर व्हिडीओ व्हायरल

बाणेर बालेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते अमेय जगताप यांनी या घटनेचा व्हिडीओ ’ट्वीटर’ या सोशल मीडियाच्या माध्यमावर नुकताच शेअर केला आहे. यासंदर्भात दै. ’पुढारी’च्या प्रतिनिधीने त्यांच्याशी संवाद साधला. या वेळी जगताप म्हणाले, बाणेर, बालेवाडी परिसरात अनेक मिसिंग लिंक रस्ते जोडले गेलेले नाहीत. त्यांचे डांबरीकरण झालेले नाही, त्यामुळे येथील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

हेही वाचा

सांगली : मणिपूर हिंसाचारावर पंतप्रधान मोदी मौन का? कॉम्रेड अंजान यांचा सवाल

स्‍व. डिडोळकर स्‍मृती ऑडिटोरियमाठी १५० कोटी : नितीन गडकरी

कात्रज टेकडीलगत बेकायदा मिनी इंडस्ट्री

Back to top button