भोर : मानवी हस्तक्षेपामुळे दरड कोसळण्यात वाढ | पुढारी

भोर : मानवी हस्तक्षेपामुळे दरड कोसळण्यात वाढ

अर्जुन खोपडे

भोर(पुणे) : विविध कारणांमुळे डोंगरात होत असलेले उत्खनन, वृक्षतोड, सलग समतल चर, नाचणीच्या शेतीसाठी पोखरलेले डोंगर, वनवे यामुळे डोंगर ठिसूळ होत चालले आहेत. परिणामी, पावसाळ्यात दरडी, मातीचे थर पडण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. डोंगर दर्‍यातील नागरिकांना जीव मुठीत धरून राहावे लागत आहे. अशा गावांचे पुनर्वसन होणे गरजेचे आहे. त्याच बरोबर डोंगर पोखरणार्‍यांनाही जरब बसविण्याची गरज आहे.

भोर तालुक्याच्या दुर्गम भागात जमिनी खरेदी करणारे डोंगरावर घरे बांधत आहेत. त्यासाठी जमीन खोदून रस्ते तयार करत जात आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणात उत्खनन केले जात आहे. झाडांची कत्तलदेखील होत आहे. यामुळे पावसाळ्यात उकरलेली माती, झुडपे वाहून खाली येतात. त्याचबरोबर सलग समतल चरामुळे डोंगर उतारावर पाणी साचण्याऐवजी चरांना भेगा पडतात. पावसाळ्यात त्यात पाणी शिरून जमीन खचत आहे. वृक्षतोड करून डोंगर उतारावर नाचणीची शेती केली जात आहे. यामुळेही जमिनीची धूप होत आहे.

रस्त्यांची कामे करण्यासाठी डोंगरात खाणी काढल्या जातात. त्यासाठी होणार्‍या ब्लास्टिंगमुळे आजूबाजूची जमीन हादरून ठिसूळ होत आहे. नर्सरी आणि वीटभट्ट्यांसाठी लागणारी माती भोर तालुक्यात पसुरे, कुरुंजी व अंगसुळे भागांतून मोठ्या प्रमाणात उत्खनन करून नेली जात आहे. रात्रंदिवस मातीची वाहतूक केली जाते. मातीमुळे डोंगर ठिसूळ झाले असून, पावसाळ्यात ढासळत आहेत. यामुळे शेतकर्‍यांच्या शेतीचे घराचे नुकसान होत आहे.

तालुक्यात विविध कारणांसाठी ज्या प्रमाणात वृक्षतोड केली जाते त्या प्रमाणात पुन्हा लागवड होत नाही. यामुळे दिवसेंदिवस जंगले कमी होत चालली आहेत. जमिनीची धूप वाढत आहे. डोंगराचा भाग ढिसूळ होऊन पाण्याच्या प्रवाहाबरोबर माती वाहून जात आहे. यामुळे डोंगर दर्‍यातील मानवी वस्त्यावर दरडी पडून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी धोकादायक गावांत विविध उपाय योजन्याची गरज आहे. परंतु, शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. जंगले तोडणारे, डोंगरात रस्ते काढणारे, वणवा लावून वनांचा नाश करणारे, नर्सरीसाठी डोंगरातील माती उकरणारे, रस्त्यासाठीच्या डबरसाठी डोंगरात ब्लास्टिंग करणार्‍यांवर प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

धोकादायक वरची धानवली

डेहेण, सोनारवाडी, कोर्ले, जांभुळवाडी या गावांचा धोकादायक गावांत समावेश आहे. सदर गावांना पावसाळ्यात धोका होऊ नये म्हणून लाखो रुपयांचा निधी मंजूर झाला. परंतु, निधीच खर्च झाला नाही. काही कामे अर्धवट असल्याने धोका कायम आहे. यावर्षी पावसाळ्यात वरची धानवली गावात डोंगर कोसळून मोठ्या प्रमाणात दगड, माती, झाडे घरांवर येण्याची शक्यता आहेत. त्यामुळे येथील लोकांनी सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करण्याची मागणी केली आहे. परंतु, शासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे.

हेही वाचा

सासवड शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा

भीमाशंकरमध्ये हुल्लडबाज, मद्यपी तरुणांवर कारवाई

राज्यातील सरकारी रुग्णालयात 13 हजार 391 पदे रिक्त

Back to top button