मीना नदी व घोड शाखेला त्वरित पाणी सोडा : उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे मागणी | पुढारी

मीना नदी व घोड शाखेला त्वरित पाणी सोडा : उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे मागणी

पारगाव : पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील गावांसाठी वरदान ठरलेल्या मीना नदी व डिंभे धरणाची (हुतात्मा बाबू गेणू जलसागर) घोड शाखा सध्या कोरडेठाक पडली आहे. त्यामुळे अनेक गावांमधील पिण्याचे पाणी, जनावरांच्या चारा पिकांचा प्रश्न गंभीर बनला आहे. मीना नदी व घोड शाखेला त्वरित पाण्याचे आवर्तन सोडा, अशी मागणी शेतकर्‍यांच्या वतीने शरद सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष शिवाजीराव लोंढे व तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष रमेश खिलारी यांनी केली.

या संदर्भातील निवेदन लोणी (ता. आंबेगाव) येथे नुकत्याच लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत शेतकर्‍यांच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देण्यात आले. वाढत्या तापमानामुळे मीना नदीपात्र व डिंभे धरणाच्या डाव्या कालव्याची घोड शाखा कोरडीठाक पडली आहे. त्यामुळे तालुक्याच्या पूर्व भागातील थोरांदळे, जाधववाडी, कारफाटा, खडकी, नागापूर, वळती, भराडी, शिंगवे आदी गावांमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. जनावरांची चारा पिकेदेखील जळाली आहेत. जलसंपदा विभागाने मीना नदीपात्र व घोड शाखेत त्वरित पाणी सोडणे गरजेचे आहे, असे निवेदनात नमूद केले आहे.

हेही वाचा

Back to top button