राज्यातील सरकारी रुग्णालयात 13 हजार 391 पदे रिक्त | पुढारी

राज्यातील सरकारी रुग्णालयात 13 हजार 391 पदे रिक्त

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  राज्यातील सरकारी रुग्णालये आणि दंत महाविद्यालयांत एकूण 13 हजार 391 पदे रिक्त आहेत. आयुर्वेद महाविद्यालयांतील रिक्त पदांची संख्या 876 इतकी आहे. यातील गट अ आणि बमधील रिक्त पदे सरळसेवेने व पदोन्नतीने भरण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. तसेच विभागाच्या अखत्यारीतील सर्व पदे भरली जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.

राज्यातील सरकारी रुग्णालयांतील रिक्त पदांबाबत विधान परिषदेत विचारलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरावर बोलताना मंत्री मुश्रीफ यांनी ही माहिती दिली. विभागातील गट अ व ब ची पदे भरताना डॉक्टरांची कमतरता असते. ही पदे भरण्यासाठी डॉक्टरांना चांगला पगार, अधिकच्या सुविधा देण्याची आवश्यकता मंत्री मुश्रीफ यांनी बोलून दाखविली. त्यामानाने गट क व ड ची पदांसाठी उमेदवार मिळण्यात अडचण नसते असेही ते म्हणाले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील गट अ व ब मधील पदे सरळ सेवेने भरण्याची कार्यवाही सुरू असून आतापर्यंत प्राध्यापक संवर्गातील 91, सहायक प्राध्यापक संवर्गातील 525 पदे सरळसेवेने भरली आहेत. प्राध्यापक संवर्गातील 117 अध्यापकांना पदोन्नतीने नियुुक्ती देण्यात आल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.

सरकारी वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयांतील रिक्त पदे

अधिष्ठाता – 8
प्राध्यापक – 245
सहयोगी प्राध्यापक – 400
सहायक प्राध्यापक – 1008
गट क – 7756
गट ड – 3974
एकूण – 13391

सरकारी आयुर्वेदिक महाविद्यालये

अधिष्ठाता – 2
प्राध्यापक – 26
सहयोगी प्राध्यापक – 44
सहायक प्राध्यापक – 86
गट क – 510
गट ड – 210
एकूण – 876

Back to top button