सासवड शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा | पुढारी

सासवड शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा

सासवड(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पुरंदर तालुक्यातील प्रमुख सासवड शहराला गराडे व घोरवडी धरणातून पाणीपुरवठा केला जातो; परंतु पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत असल्याने सासवड शहराच्या पाणीपुरवठा योजनेवर पाणीटंचाईचे संकट आले आहे. आता गराडे धरणातील पाणीसाठा संपलेला आहे, तर घोरवडी धरणात 0.11 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याचे जलसंपदा शाखा अभियंता गणेश गायकवाड यांनी सांगितले. घोरवडी धरणातून दिवे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत सुपे खुर्द, पिंपळे, पोमणनगर व भिवडी आदी ग्रामपंचायतींना तसेच सासवड नगरपरिषदेला पाणीपुरवठा केला जातो.

यावर्षी सासवडकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाळ्यात दिवसेंदिवस पाऊस लांबत चालल्याने पाणीसाठ्यात वाढ झाली नसल्याने सासवड शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे, अशी माहिती पाणीपुरवठा अभियंता संकेत नंदवंशी यांनी दिली पुरंदर तालुक्यात जून महिन्याच्या सरासरीच्या पन्नास टक्के पाऊस पडलेला आहे. गराडे धरणाने तळ गाठला आहे. घोरवडी धरणातून पाणीसाठा कमी होत असल्याने नागरिकांनी जपून पाणी वापरावे, असे आवाहन सासवड नगरपरिषद मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी केले आहे.

Back to top button