Arvind Kejriwal : ‘हुकूमशाही संपेल, जनताच न्याय करेल’, तुरुंगातून बाहेर येताच केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

अरविंद केजरीवाल (संग्रहित छायाचित्र )
अरविंद केजरीवाल (संग्रहित छायाचित्र )
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना शुक्रवारी (१० मे) सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला त्यानंतर संध्याकाळी ६ च्या सुमारास त्यांची तिहार तुरुंगातून सुटका करण्यात आली. यावेळी तिहार तुरुंगाबाहेर आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केजरीवालांचे उत्सफूर्त स्वागत केले. तर केजरीवालांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. आम आदमी पक्ष आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांनीही हा 'सत्याचा विजय आहे' म्हणत आनंद व्यक्त केला. तर भाजपने अरविंद केजरीवालांना जामीन मिळाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणी तिहार तुरुंगात अंतरिम जामीनावर सुटका झाल्याने कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. अरविंद केजरीवालांच्या तुरुंगातून सुटकेनंतर रोड शो काढण्यात आला. तसेच त्यांच्या निवासस्थानी फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. केजरीवालांच्या जामीनावर सुटकेने आम आदमी पक्षाचे नेते, कार्यकर्ते आनंदित झाले आहेत. तिहार तुरुंगातून अरविंद केजरीवाल बाहेर आल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले.

ते पुढे म्हणाले, 'मी लवकरच परत येण्याचे तुम्हाला वचन दिले होते, आज मी परत आलो. मला तुम्हा सर्वांचे आभार मानायचे आहेत. तुम्ही मला तुमचे आशीर्वाद दिलेत. तसेच मला सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे आभार मानायचे आहेत, त्यांच्यामुळेच मी बाहेर आलो. आपल्याला देशाला हुकूमशाहीपासून वाचवायचे आहे,' असे आवाहनही त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले.

अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांची अंतरिम जामीनावर सुटका करण्यात यावी, या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर आम आदमी पक्ष, काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

अरविंद केजरीवाल जी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे, आम्ही या निर्णयाचे स्वागत करतो. आम्हाला आशा आहे की, झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनाही लवकरच न्याय मिळेल.

– पवन खेडा, काँग्रेस राष्ट्रीय प्रवक्ता

अरविंद केजरीवाल यांना फक्त अंतरिम जामीन मिळाला नाही, तर सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे सत्याचा विजय झाला आहे, हा लोकशाही आणि संविधानाचा विजय आहे. लोकशाही रक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाने महत्वाची भूमिका बजावली आहे.

-अतिशी, मंत्री आणि आपच्या नेत्या

४० दिवसांत अंतरिम जामीन मिळणे हा चमत्कार आहे. अरविंद केजरीवाल यांना भगवान बजरंगबलीचा आशीर्वाद मिळाला आहे.

– सौरभ भारद्वाज, आप नेते

अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मिळाल्याचे जाणून मला आनंद झाला. सध्याच्या निवडणुका पाहता हे खूप उपयुक्त ठरेल.

– ममता बॅनर्जी, प. बंगाल मुख्यमंत्री

ज्या देशाची राज्यघटना लाखो हुतात्म्यांच्या बलिदानाने बनली त्या देशाची राज्यघटना कोणीही नष्ट करू शकणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्याबद्दल संपूर्ण देश सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो.

­- गोपाळ राय, आप प्रदेशाध्यक्ष, दिल्ली

सर्वोच्च न्यायालयाचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन देण्याच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. नागरिकांच्या घटनात्मक अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी हा मोठा निर्णय आहे.

– कन्हैय्या कुमार, काँग्रेस नेता

केजरीवालांना 1 जूनपर्यंत निवडणूक प्रचारासाठी जामीन देण्यात आला आहे, पण त्यानंतर काय? अंतरिम जामीन मिळाल्याचा अर्थ असा नाही की, तुम्ही निर्दोष सिद्ध झाला आहात. याचा निवडणुकीवर परिणाम होणार नाही, भाजप दिल्लीच्या सर्व 7 जागा जिंकेल.

– वीरेंद्र सचदेवा, भाजप प्रदेशाध्यक्ष, दिल्ली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news