खासदार निधीबाबत विरोधकांनी दिशाभूल करु नये : प्रीतम मुंडे | पुढारी

खासदार निधीबाबत विरोधकांनी दिशाभूल करु नये : प्रीतम मुंडे

आष्टी, पुढारी वृत्तसेवा : खासदार निधी परत जात नसतो. हे सामान्य ज्ञान नसलेल्या विरोधकांनी दिशाभूल करु नये. खासदार फंड लॕप्स होतच नसतो. अनेक विकास कामे आपण केली आहेत. त्यामुळे ‘अरे ला कारे’ म्हणण्याची गरज नाही. विकास कामांच्या जोरावर आपण नक्की विजयी होऊ, सर्वाधिक लीड पंकजा मुंडे यांना मिळून त्या विजयी होतील, असा विश्वास खा.डॉ. प्रीतम मुंडे यांनी व्यक्त केला.
बीड लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ आष्टी येथील मोरेश्वर लॉन्समध्ये सभा झाली. यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी माजी आ. भीमराव धोंडे होते.

यावेळी माजी आ. गोविंदराव केंद्रे, दिलीप हंबर्डे, ॲड. सुधीर घुमरे, ॲड. साहेबराव म्हस्के, डॉ. अजय धोंडे, वाल्मिक निकाळजे, शिवाजीराव शेंडगे, हरीश खाडे, रामराव खेडकर, ॲड. रत्नदीप निकाळजे, भाऊसाहेब मेटे, बबन झांबरे, रघुनाथ शिंदे, बबनराव औटे, रिपाइंचे तालुकाध्यक्ष अशोक साळवे, माऊली पानसंबळ, भाग्यश्री ढाकणे, माजी सभापती सुवर्णा लांबरुड, प्रकाश सोनसळे, दादा जगताप यांची भाषणे झाली.

खासदार मुंडे पुढे म्हणाल्या की, खासदार फंड परत जात नाही, हे विरोधी उमेदवाराला माहीत नसावे ? आपण कोणी ही जाऊन खासदार निधीची महिती बीड जिल्हाधिकारी यांच्या नियोजन विभागात जाऊन घ्यावी. खासदार निधी परत जात नाही, हे माहीत नसणाऱ्यांच्या हातात तुम्ही जिल्ह्याचे सूत्रे देणार का? असा सवाल त्यांनी यावेळी केला.

बजरंग सोनवणे आणि पंकजा मुंडे यांची तुलनाच होऊ शकत नाही, असा टोला भीमराव धोंडे यांनी यावेळी लगावला. मी चार वेळा आमदार झालो आहे. जातीपातीवर काही नसते. तसे असते तर दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे, मी अथवा प्रितम मुंडे यांना लोकांनी निवडूनच दिले नसते.

हेही वाचा 

Back to top button