पळसदेव : उजनी परिसरातील मोरांच्या संख्येत घट | पुढारी

पळसदेव : उजनी परिसरातील मोरांच्या संख्येत घट

प्रवीण नगरे

पळसदेव(पुणे) : ‘नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच…’ हे बालगीत आपण अनेकदा ऐकले असेल. गाणे ऐकताना थुई थुई नाचणार्‍या मोराच्या पिसार्‍याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. परंतु, उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील बागायती पट्ट्यात यापूर्वी मोठ्या संख्येने दिसणारे मोर आता दुर्मीळ झाले आहेत.

काही वर्षांपूर्वी इंदापूर तालुक्यातील पळसदेव परिसरातील बांडेवाडी, माळेवाडी, शेलारपट्टा, काळेवाडी, डाळज आदी भागांत मोराचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात होते. पहाटे त्यांच्या ओरडण्याच्या आवाजाने अनेकांना जाग येत होती. मोरांच्या वास्तव्याने गावचा परिसर अतिशय सुंदर वाटत होता. परंतु, दिवसेंदिवस वातावरणात होणारे बदल, शेतकर्‍यांकडून शेतात होणारी रासायनिक औषधांची फवारणी, शिकार्‍यांकडून होणारी शिकार आदी कारणांमुळे इतर पक्ष्यांची व मोरांची संख्या तुलनेने मोठ्या प्रमाणात घटली आहे.

शेतातील बांधावरील झाडांवर नेहमी पाहावयास मिळणारे मोर सध्या अतिशय कमी झाले आहेत. राष्ट्रीय पक्षी असणार्‍या मोराकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने मोरांचे अस्तित्व नामशेष होत आहे. इंदापूर तालुक्याच्या उजनी बागायती परिसरात मोरांची संख्या कमी होऊ लागली आहे. मोरांचे प्रजनन वाढविण्यासाठी वन विभागाने तसेच शासनाने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे; अन्यथा राष्ट्रीय पक्षी मोर आगामी काळात चित्रातूनच पाहावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शेतीव्यवसायात झालेल्या आमूलाग्र बदलामुळे मोरांच्या अस्तित्वावर विपरीत परिणाम झाला आहे. तांत्रिक शेतीमुळे मोरांचे अधिवास धोक्यात आले आहे. अनेक जण शेतात वस्ती करून राहायला आल्यामुळे पाळीव कुत्र्यांकडूनही मोरांना धोका निर्माण झाला आहे. काही ठिकाणी चोरून शिकार होत आहे. मानवनिर्मित समस्यांमुळे मोरांची संख्या घटत चालली आहे.

– डॉ. अरविंद कुंभार,
ज्येष्ठ पक्षी व पर्यावरण अभ्यासक

हेही वाचा

जुलै महिन्याच्या पहिल्या 10 दिवसांत 34 जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस

पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर वर्षाविहारासाठी पर्यटकांनी गजबजले

एक रुपयात पीक विमा; अर्ज भरण्यासाठी शंभर-दोनशे रुपये!

Back to top button