पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर वर्षाविहारासाठी पर्यटकांनी गजबजले | पुढारी

पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर वर्षाविहारासाठी पर्यटकांनी गजबजले

मंचर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : शनिवार व रविवार या सलग दोन सुट्ट्यांमुळे पुणे जिल्ह्यातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे असलेले श्री क्षेत्र भीमाशंकर भाविकांसह पर्यटकांनी गजबजून गेले होते. दाट धुके, बोचरी थंडी आणि कोसळणार्‍या पावसात डोंगरकड्यावरून कोसळणारे धबधबे, हिरवाईने नटलेल्या डोंगररांगा पाहताना सर्वजण हरखून गेले होते. मात्र, मोठ्या संख्येने आलेल्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागला.

दर्शन व पर्यटन अशा दोन्ही हेतूने शनिवार व रविवारी सुटीमुळे राज्याच्या कानाकोपर्‍यातून लाखो भाविक व पर्यटक भीमाशंकर येथे आले होते. सलग महर हर महादेवफच्या गजराने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. भाविकांनी रांगेत उभे राहून शिवलिंगाचे दर्शन घेतले. दर्शनरांग लांबपर्यंत पोहोचली होती.

दुसरीकडे मोठ्या वाहनांची संख्या जास्त होती. त्यामुळे वाहनांच्या रांगा लांबपर्यंत लागल्या आणि वाहतूक कोंडी झाली. वाहनतळ क्रमांक एक व दोन पूर्ण क्षमतेने भरल्याने भीमाशंकरपासून निगडाळेपर्यंत रस्त्याच्या कडेला वाहने उभा केल्याने वाहतूक कोंडीत भर पडली. त्याचा भाविकांसह स्थानिकांना त्रास सहन करावा लागला. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी घोडेगाव पोलिस ठाण्याचे कर्मचारी काम करीत होते.

भीमाशंकर येथे वाहनतळांची क्षमता वाढवणे अत्यंत गरजेचे आहे. वाहतूक कोंडी झाल्यामुळे एसटी बसेस बस स्थानकापर्यंत पोहचू शकत नव्हत्या. त्यामुळे वृद्ध, महिलावर्गाला एसटी बसपर्यंत पोहचणे मुश्कील झाले होते. खासगी वाहनांना स्वतंत्र वाहनतळ होणे अत्यंत गरजेचे आहे.

– प्रदीप आमोडकर,
संचालक शरद बँक, मंचर

हेही वाचा

पुणे : शरीरसुखाची मागणी केल्याने निर्घृण खून

पुणे : ऑगस्टमध्ये वाजणार शालेय क्रीडा स्पर्धांचा बिगुल

पुणे : जादूटोण्यासाठी सॉफ्टवेअर अभियंत्याला तब्बल 28 लाखांचा गंडा

Back to top button