जुलै महिन्याच्या पहिल्या 10 दिवसांत 34 जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस | पुढारी

जुलै महिन्याच्या पहिल्या 10 दिवसांत 34 जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस

कोल्हापूर, आशिष शिंदे : राज्यात यंदा मान्सून उशिरा दाखल झाल्याने अख्खा जून महिना कोरडा गेला असून जुलैच्या पहिल्या दहा दिवसांमध्ये केवळ नावालाच पाऊस झाला. जुलैमध्येही दिवसभर मान्सूनचे ढग आकाशात दिसत असले तरी प्रत्यक्षात पावसाची केवळ भुरभुर चालू आहे. राज्यात जुलैच्या पहिल्या दहा दिवसांमध्ये 34 जिल्ह्यांत सरासरी 23 टक्के कमी पाऊस झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात तर सरासरीच्या 32 टक्के कमी पावसाची नोंद झाली असून सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये देखील जुलैच्या पहिल्या दहा दिवसांची सरासरी पावसाने गाठलेली नाही. त्यामुळे ‘काले मेघा… काले मेघा… पानी तो बरसाओ’ अशी आर्जवे करण्याची वेळ महाराष्ट्रावर आली आहे.

उत्तर भारतात पावसाचा कहर सुरू असला तरी यंदा महाराष्ट्रात मात्र पावसाने सर्वांनाच कन्फ्यूज केले आहे. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजालाही पावसाने हुलकावणी दिली आहे. राज्यात जूनच्या पहिल्या दहा दिवसांमध्ये 310.7 मि.मी. इतका पाऊस होतो. यंदा मात्र 23 टक्के कमी 240.5 मि.मी. इतकाच पाऊस झाला आहे. याच कालावधीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात 575.0 मि.मी. इतका पाऊस होतो. यंदा केवळ 391.5 मि.मी. पाऊस झाला आहे. मध्य महाराष्ट्रातील 10 जिल्हे, मराठवाड्यातील 8, विदर्भातील 11 आणि मुंबईसह पाच जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी झाला आहे.

गतवर्षी यावेळी पंचगंगेला आला होता पूर

जूनची कसर पावसाने भरून काढण्यास सुरुवातही केली आहे. मात्र अजूनही म्हणावा तसा जोर पावसाने धरला नाही. गेल्या वर्षी जुलै महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांमध्ये झालेल्या दमदार पावसामुळे पंचगंगेला पूर आला होता. 12 जुलैला पाणी पात्राबाहेर आले होते. यंदा मात्र चित्र वेगळे आहे. गेले चार दिवस सुरू असलेल्या पावसामुळे पंचगंगेची पाणी पातळी 20 फुटांवर गेली होती. मात्र पावसाने उसंत घेतल्याने पुन्हा पाणीपातळीत घट होत आहे.

दोनच जिल्ह्यांत पावसाने गाठली सरासरी

जुलैच्या पहिल्या दहा दिवसांमध्ये दोनच जिल्ह्यांमध्ये पावसाने सरासरी गाठली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अहवालानुसार मुंबई उपनगरामध्ये 1043.8 मि.मी. पाऊस झाल आहे. या कालावधीमध्ये येथे सरासरी 842.4 मि.मी. पाऊस होतो; तर ठाणे जिल्ह्यात 753.9 मि.मी. पाऊस होतो. यंदा 904.0 मि.मी. इतका पाऊस झाला आहे.

Back to top button