पुणे : फेरीवाल्याकडून एसटी वाहकाला बेदम मारहाण | पुढारी

पुणे : फेरीवाल्याकडून एसटी वाहकाला बेदम मारहाण

राजगुरूनगर, पुढारी वृत्तसेवा : राजगुरूनगर एस.टी. बस स्थानक आवारात शनिवारी (दि १६) एस.टी. बसमध्ये भेळ विक्री करण्यासाठी बसमध्ये प्रवेश  दिला नाही, या कारणास्‍तव परप्रांतीय फेरीवाल्याकडून वाहकाला बेदम मारहाण करण्यात आली.  यावेळी एसटी बस वाहक बाळासाहेब चिमाजी नांगरे , (वय ४८ ,वाडा रोड,राजगुरूनगर, मूळ उंडेखडक,ता जुन्नर) हे जखमी झाले आहेत. तर फेरीवाला अमन मुकेश सिंह (वय १९ वर्ष,जससुपुरा,धौलपुर, राजस्थान) याच्यावर खेड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, भीमाशंकरवरून (कुर्ला) मुंबईकडे निघालेली राजगुरूनगर आगाराची एस.टी बस (क्र एम १४ बीटी ३१६७) दोन वाजता राजगुरूनगर स्थानकात आली होती. बस निघण्याच्या तयारीत असताना फेरीवाला अमन हा घाईघाईने भेळ विक्री साठी एस.टीबसमध्ये प्रवेश करु लागला. उशीर होतो म्हणून वाहक नांगरे यांनी त्याला दरवाजा बंद करून मागे सारले.

जागेवर उभ्या असलेल्या बसमध्ये तो पुन्हा जबरस्तीने दरवाजा उघडून आतमध्ये घुसु लागला. वाहक नांगरे यांनी विरोध करताच अमनने नांगरे यांना हाताला धरून खाली खेचले. धक्काबुक्की करुन त्यांना खाली पाडले. यात नांगरे यांचा चष्मा फुटुन डोळ्याजवळ मोठी जखम झाली. चालक, प्रवाश्यानी मध्यस्थी करून दोघांना बाजुला केले.

राजगुरूनगर एसटी बसस्थानक आवारात मुळातच असुरक्षित व अस्वच्छ वातावरण आहे. स्थानकात विद्यार्थी, विद्यार्थिनी ,महिला यांची संख्या जास्त असते. रोडरोमिओंचा त्रास आहेच. त्यात फेरीवल्याकडून देखील त्रास होऊ लागला आहे. लांब पल्याच्या बस स्थानकात आल्यावर बहुतेक प्रवासी झोपलेल्या अवस्थेत असतात. त्यांच्याकडे पैसे, मौल्यवान वस्तू असतात. अश्यावेळी फेरीवाले बसमध्ये जबरस्तीने घुसून पदार्थ विक्री करतात. त्यांच्याकडून अनेक गोष्टी घडतात. फेरीवाल्यांबाबतीत एसटी बस प्रशासनाने दक्षता घेण्याची व पोलिसांनी कडक कारवाई करवी, अशी मागणी प्रवाशांकडून हाेत आहेत.

हेही वाचा : 

Back to top button