प्रज्वल रेवण्णाला भारतात आणेपर्यंत महिला काँग्रेस देशात आवाज उठवेल | पुढारी

प्रज्वल रेवण्णाला भारतात आणेपर्यंत महिला काँग्रेस देशात आवाज उठवेल

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : प्रज्वल रेवण्णा प्रकरणावरून काँग्रेसने पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला. जोपर्यंत भारत सरकार प्रज्वल रेवण्णाला भारतात आणून कर्नाटक सरकारकडे सोपवणार नाही, तोपर्यंत महिला काँग्रेस देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून याप्रकरणी आवाज उठवेल, या मागणीसाठी महिला काँग्रेस राष्ट्रपतींना भेटून याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी करेल, देशाच्या प्रत्येक राज्यातील राजभवनाला घेराव करेल, असेही काँग्रेसने म्हटले आहे.

प्रज्वल रेवण्णा प्रकरण बाहेर आल्यापासून काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली. प्रज्वल रेवण्णावर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच या प्रकरणात बळी पडलेल्या महिलांना सर्वतोपरी मदत करण्यात यावी, असे पत्र कालच राहुल गांधींनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना लिहिले होते. त्यानंतर  महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा अलका लांबा यांनी काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्र सरकारसह पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी तसेच महिला आयोगाच्या अध्यक्षांवरही जोरदार हल्ला चढवला.

“कर्नाटकातील स्थानिक भाजपच्या नेत्यांनी प्रज्वल रेवण्णाला उमेदवारी देऊ नये, असे सांगतानाच त्याच्या कुकर्माची यादी पक्ष नेतृत्वाला दिली, पत्रकार परिषद घेतली. त्यानंतरही भाजपच्या सहयोगी पक्षाने त्यांना उमेदवारी दिली. केवळ उमेदवारी देऊन हे प्रकरण थांबले नाही तर देशाचे पंतप्रधान स्वतः त्यांचा प्रचार करण्यासाठी गेले, त्याचे दुष्कृत्य उघड झाल्यानंतर मात्र पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच महिला व बालविकास मंत्री आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा देखील या प्रकरणावर शांत आहेत.” हे गंभीर असल्याचे अलका लांबा म्हणाल्या.

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा या मूग गिळून गप्प

“प्रज्वल रेवण्णा प्रकरण हे अत्यंत भयावह असून जवळपास तीन हजार व्हिडीओ त्याचे सापडले आहेत. मात्र एरवी बोलणाऱ्या महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा या मूग गिळून गप्प बसल्या आहेत. केंद्र सरकार प्रज्वल रेवण्णाचा बचाव करण्याचा प्रयत्न करत आहे,” असा आरोपही अलका लांबा यांनी यावेळी केला.

हेही वाचा : 

Back to top button