भंडारा : अबब… महिलेच्या गर्भ पिशवीतून निघाले भले मोठे कापड; तुमसर उपजिल्हा रुग्णालयातील प्रकार | पुढारी

भंडारा : अबब... महिलेच्या गर्भ पिशवीतून निघाले भले मोठे कापड; तुमसर उपजिल्हा रुग्णालयातील प्रकार

भंडारा; पुढारी वृत्तसेवा : तुमसर येथील सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीकरीता आलेल्या महिलेच्या गर्भ पिशवीत चक्क कापडच टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

तुमसर तालुक्यातील तामसवाडी येथील हिमानी हरिराम पांडे ही महिला पहिल्या प्रसुतीकरिता सुभाषचंद्र बोस शासकिय उपजिल्हा रुग्णालय तुमसर येथे २४ एप्रिल २०२४ रोजी दाखल झाली होती. २५ एप्रिल २०२४ला तिची नॉर्मल प्रसूती झाली. साधारणत: नॉर्मल प्रसूती दरम्यान रक्तस्त्राव होऊ नये म्हणून कापड ठेवला जातो. तो कापड १२ ते २४ तासाच्या आत काढावा लागतो.

मात्र, येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे तो कापड न काढता तो कापड गर्भ पिशवीतच ठेवला. दरम्यान नॉर्मल प्रसूती झालेल्या त्या महिलेला २७ तारखेला रुग्णालयातुन सुट्टी देण्यात आली. घरी गेल्यावर तीन, चार दिवसांनी तिला असह्य वेदना होवु लागल्या व घरात घाण वास येऊ लागल्याने सदर महिला घाबरली व तात्काळ तुमसर येथील खासगी रुग्णालय गाठले. खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी तिच्या गर्भाशयात कापड असल्याचे सांगितले तेव्हा महिलेला धक्काच बसला. त्यानंतर वेळीच उपचार करून तो कापड काढण्यात आला.मात्र, ते कापड २४ तासात काढला नसल्याने कापड आत मध्ये पूर्ण सडलेल्या अवस्थेत होता. तसेच महिलेच्या शरीरात इन्फेक्शन लवकर पसरले होते.

उपजिल्हा रूग्णालयात होणाऱ्या या प्रकारामुळे अनेक महिलांना आपला जीव सुद्धा गमावला असल्याची माहिती पुढे आली आहे. हा प्रकार उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाने घडत आहेत. प्रसूती दरम्यान स्त्रीरोग तज्ञ हजर राहत नसल्याने असे प्रकार घडत आहेत. नुसते परिचारीकांच्या जबाबदारीवर येथे प्रसूती केली जात आहे. ही गंभीर बाब आहे. सदर बाबीची चौकशी करुन दोषीवर कारवाई करण्याची मागणी महिलेचे पती हरिराम पांडे यांनी केली आहे.

Back to top button