पिंपरी : शहरभर फुटणाऱ्या फटाक्यांचा आवाज मोजणार कसा ? | पुढारी

पिंपरी : शहरभर फुटणाऱ्या फटाक्यांचा आवाज मोजणार कसा ?

संतोष शिंदे : 

पिंपरी : शासन निर्णयानुसार फटाका स्टॉलसह मोठ्या आवाजांच्या फटाक्यांवर निर्बंध लावण्यात आले आहेत. तसेच, फटाके फोडण्याची वेळदेखील निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी शासन निर्णयांची अंमलबजावणी करण्याचे आदेश प्रभारी अधिकार्‍यांना दिले आहेत. मात्र, पोलिस आयुक्तलयात केवळ 25 नॉईस मीटर (आवाजाची मर्यादा तपासण्याचे यंत्र) आहेत. एका पोलिस ठाण्यात एक किंवा दोन नॉईस मीटर देण्यात आले आहेत. त्यामुळे ऐन दिवाळीत शहरभर मोठ्या प्रमाणात वाजणार्‍या फटाक्यांचा आवाज पोलिस मोजणार कसा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पोलिस आयुक्तलयात उपलब्ध असलेले 25 नॉईस मीटर गरजेनुसार पोलिस ठाण्यांना देण्यात आले आहेत. त्यानुसार, आगामी काळात शासनाने घालून दिलेली आवाजाची पातळी ओलांडणार्‍यावर प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे.
                                       – सतीश माने, सहायक पोलिस आयुक्त, पिंपरी

शासन निर्णयाच्या चिंधड्या
उद्योगनगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी- चिंचवडमध्ये दिवाळी मोठी धूमधडाक्यात साजरी केली जाते. शहराच्या सभोवताली असलेल्या गावांमध्ये गुंठामंर्त्यांची फटाके फोडण्यासाठी चढाओढ सुरू असते. यामध्ये लाखो रुपयांचा चुराडा होतो. अशा वेळी फटक्याप्रमाणेच शासनाने घालून दिलेल्या सर्व निर्णयांच्यादेखील चिंधड्या उडत असल्याचे नेहमीच दिसून येते.

‘बोलाचीच कढी… ’
नुकतेच झालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्येदेखील डीजेचालकांनी तुफान राडा घातला. दरम्यान, विसर्जन मिरवणुकांपूर्वी पोलिस यंत्रणेने डीजे चालकांची गय करणार नसल्याचा इशारा दिला होता. मात्र, स्थानिक पोलिसांनी कारवाई केली नसल्याने पोलिस यंत्रणेचा इशारा म्हणजे ‘बोलाचीच कढी अन बोलाचाच भात’ ठरला.

असे आहेत निर्बंध
कागदात स्फोटक पदार्थ ठेवलेले व त्याभोवती दोर्‍याने गुंडाळलेला अ‍ॅटमबॉम्ब म्हणून ओळखल्या जाणार्‍या फटाक्यांवर बंदी.

पोलिस आयुक्तालयाचे परिक्षेत्रामध्ये रस्त्यांपासून 50 फूट अंतराचे आत कोणत्याही प्रकारची शोभेची दारू उडवणे, फटाके फोडण्यास मनाई.

फटाका उडविण्याच्या जागेपासून 4 मीटर अंतरावर 125 डेसीबल आवाज निर्माण करणार्‍या फटाक्यांचे उत्पादन, विक्री व वापर यावर बंदी

साखळी फटाका 50 ते 100 तसेच 100 व त्यावरील फटाके असतील तर, आवाजाची मर्यादा अनुक्रमे 115/110 व 105 डेसीबल एवढी असावी.

ध्वनी प्रदूषण करणार्‍या फटाक्यांवर रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संपूर्ण बंदी. मात्र, जे फटाके आवाज न करता विविध रंग निर्माण करतात अशा फटाक्यांवर निर्बंध नाही.

शांतता प्रभागातील रुग्णालये, शैक्षणिक संस्था, न्यायालये यांच्या सभोवतालचे 100 मीटरपर्यंतच्या क्षेत्रात कोणत्याही फटाक्याचा वापर करण्यात येऊ नये.

परवानाधारक यांनी विदेशी फटाके विक्री करू नये

फटाके विक्रीचे ठिकाणी 50 मीटरचे परिसरात वाहने पार्किंगसाठी निर्बंध.

फटाका स्टॉलजवळ आतषबाजी करण्यावर निर्बंध.

फटाका विक्री परवान्याची मुदत संपल्यानंतर फटाके अथवा शोभेची दारू यांची विक्री करता येणार नाही.

शिल्लक राहिलेले फटाके अथवा साठा हा परवाना असलेल्या गोदामामध्ये किंवा घाऊक परवाना धारण करणार्‍याकडे परत करणे आवश्यक.

Back to top button