सांगली : हुलजंतीत महालिंगराया-बिरोबा भेटीचा अभूतपूर्व सोहळा रंगणार | पुढारी

सांगली : हुलजंतीत महालिंगराया-बिरोबा भेटीचा अभूतपूर्व सोहळा रंगणार

जत; विजय रूपनूर : श्री हालमत संप्रदायातील प्रसिद्ध देवस्थान  हुलजंती (ता. मंगळवेढा) येथील महालिंगराया व हन्नूरचा बिरोबा भेट सोहळा १६ ते २५ ऑक्टोबर दरम्यान रंगणार आहे. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटकातील येणारे लाखों भक्तगण हा सोहळा ‘याची देही याची डोळा’ अनुभवणार आहेत.

महालिंगरायाला मुख्य दिवशी नैवेद्याचा मान जतच्या डफळे संस्थानिकांचा आहे. नुकतीच पट्टणकोडोली येथील विठ्ठल बिरदेवाची यात्रा पार पडली. त्यानंतर हन्नूरचा बिरोबा व महालिंगराया यांचा भेट सोहळा होत असतो. या गुरु-शिष्यांच्या पालखीचा मुख्य भेटीचा सोहळा दिपावली पाडव्याच्या पूर्वसंध्येला सोमवारी (दि.२५) दुपारी तीन वाजता संपन्न होणार आहे. आदल्या दिवशी रात्री १२ वाजता मुंडास बांधले जाते. मध्यान रात्री कैलासमधून शंकर-पार्वती येतात अन् महालिंगराया मंदिराच्या पंच शिखराला (मुंडास) आहेर करतात, अशी आख्यायिका आहे. हा सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरु-शिष्यांच्या पालखी भेटीचा सोहळा देवस्थानच्या बाजूने वाहत असलेल्या ओढ्यात होणार आहे.

गुरुशिष्यांची पालखी भेट झाल्यानंतर नगारा व ढोल वाजवीत इतर पालख्या महालिंगराया पालखीची भेट घेतात. यावेळी ‘महालिंगराया-बिरोबाच्या नावानं चांगभलं’ च्या गजरात आकाशात भंडारा, लोकर व खोबरे उधळण्यात येते. या अगोदर सात पालख्यांचा भेटीचा मान आहे. सोन्याळ (ता. जत) येथील विठुराया, उटगी येथील भरमदेव, शिरडोन येथील बिरोबा यासह अन्य देवाच्या पालख्यांचा भेट सोहळा होतो. हा भक्तिमय सोहळा आठवडाभर सुरू असतो.

हेही वाचा :

Back to top button