वडगाव काशिंबेगच्या व्यावसायिकांचे नुकसान; बैलगाडा शर्यत रद्दचा परिणाम | पुढारी

वडगाव काशिंबेगच्या व्यावसायिकांचे नुकसान; बैलगाडा शर्यत रद्दचा परिणाम

मंचर; पुढारी वृत्तसेवा: कळंब येथे तीन जनावरांमध्ये लम्पी रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्याने श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग येथील बैलगाडा शर्यत प्रशासनाने रद्द केली आहे. त्यामुळे व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, बैलगाडा मालकांमध्ये नाराजी पसरली आहे. ग्रामस्थांनी शर्यतीसाठी केलेली जय्यत तयारीही वाया गेली आहे. गणेश फेस्टिव्हलनिमित्त अर्धपीठ गणपती तीर्थक्षेत्र असलेल्या श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग येथे मागील 17 वर्षांपासून बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले जाते.

शर्यतीवरील बंदी उठल्यानंतर तसेच कोरोनाचे सावट कमी झाल्यानंतर पहिल्यांदाच येथे शर्यत होणार होती. त्यासाठी तब्बल 675 बैलगाडा मालकांनी नावनोंदणी केली होती. मागील महिनाभरापासून यात्रेची तयारी ग्रामस्थांनी केली होती. शर्यतीचा घाट तयार करणे, तसेच इतर कामे उत्साहाने करण्यात आली होती. दोन दिवस मुसळधार पाऊस पडल्याने शर्यतीच्या घाटातील भराव वाहून गेला होता. मात्र गुरुवारी (दि. 1) दिवसभर ग्रामस्थांनी कष्ट करून घाट पूर्ववत केला.

घाटात कच टाकून रोलर फिरवत धावपट्टी पूर्ववत करण्यात यश आले. घाटातील मंडप, स्टेजचे काम पूर्ण झाले होते. स्पीकर व्यवस्था सज्ज होती; मात्र सायंकाळी साडेसात वाजता बैलगाडा शर्यत रद्द करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले व ग्रामस्थांचा हिरमोड झाला. बैलगाडा मालकसुद्धा नाराज झाले आहेत.

लंपी रोगाचा प्रादुर्भाव झालेली जनावरे आढळल्याने कळंब परिसरातील दहा किलोमीटर बाधित क्षेत्र व निगराणी म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे वडगाव येथील शर्यत रद्द केल्याचे प्रशासनाने सांगितले. मात्र तीन दिवस शर्यती होणार असल्याने व्यावसायिकांनी माल भरून ठेवला होता. त्यामुळे मोठे भांडवल गुंतवण्यात आले होते. शर्यतीच्या घाटाच्या शेजारी स्टॉल उभारण्यात आले होते. लाखो रुपयांची गुंतवणूक व्यावसायिकांनी केली होती. मात्र अचानक यात्रा रद्द झाल्याने व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

जुनेच टोकन जपून ठेवण्याचे आवाहन
या संदर्भात वडगाव काशिंबेग ग्रामस्थांनी सकाळी बैठक घेतली. लम्पी रोगाचा प्रादुर्भाव कमी होऊन प्रशासनाने परवानगी दिल्यानंतर लगेचच बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले जाणार आहे. विशेष म्हणजे आता ज्या बैलगाडा मालकांनी नावनोंदणी केली आहे, त्यांना सहभाग घेता येणार आहे. बैलगाडा मालकांनी त्यांना दिलेले टोकन जपून ठेवावे, असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.

Back to top button