२३ देशांचे निवडणूक व्यवस्थापन संस्थांमधील ७५ प्रतिनिधी भारत दौऱ्यावर; महाराष्ट्राचाही दौरा करणार | पुढारी

२३ देशांचे निवडणूक व्यवस्थापन संस्थांमधील ७५ प्रतिनिधी भारत दौऱ्यावर; महाराष्ट्राचाही दौरा करणार

प्रशांत वाघाये

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : देशात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीचे साक्षीदार होण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने जागतिक निवडणूक व्यवस्थापन संस्थांना निमंत्रण दिले आहे. या अंतर्गत जगाच्या पाठीवरील २३ देशांमधील ७५ प्रतिनिधी भारत दौऱ्यावर आले आहेत. देशातील ६ राज्यांना या प्रतिनिधी मंडळाचे छोटे समूह भेट देतील, त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचा दौरा देखील हे आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी करणार आहेत.

देशात सध्या सुरु असलेल्या लोकसभा निवडणूक २०२४ दरम्यान निवडणूक अभ्यागतांचा विशेष कार्यक्रम भारतीय निवडणूक आयोगाने आयोजित केला आहे. या माध्यमातून आंतरराष्ट्रीय सहकार्याची जोपासना करण्याचे कार्यही आयोगाने केले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिनिधींचा सहभाग आणि दौऱ्याचा आवाका यांच्या संदर्भात अशा पद्धतीचा हा पहिलाच कार्यक्रम आहे.

‘या’ देशांमधील प्रतिनिधी सहभागी होणार

यामध्ये जगभरातील भूतान, मंगोलिया, ऑस्ट्रेलिया, मादागास्कर, फिजी, किरगीझ, रशिया, मोल्दोवा, ट्युनिशिया, सेशेल्स, कंबोडिया, नेपाळ, फिलिपाईन्स, श्रीलंका, झिम्बाब्वे, बांगलादेश, कझाकिस्तान, जॉर्जिया, चिली, उझबेकिस्तान, मालदीव्ज, पापुआ न्यू गिनी आणि नामिबिया अशा २३ देशांमधील ७५ प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. निवडणूक यंत्रणांसाठीच्या आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठानाचे (आयएफईएस) सदस्य तसेच भूतान आणि इस्रायल या देशांतील माध्यमांचे प्रतिनिधी देखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

कसा आहे आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींचा दौरा?

या कार्यक्रमात परदेशातील जागतिक निवडणूक व्यवस्थापन संस्थांच्या सर्व प्रतिनिधींना भारतीय निवडणूक यंत्रणेतील बारकावे तसेच जगातील सर्वात मोठ्या लोकशाही व्यवस्थेतर्फे अमलात आणल्या जाणाऱ्या सर्वोत्तम पद्धतींविषयी अवगत करण्यात आले. ५ मे रोजी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि डॉ. सुखबीर सिंग संधू कार्यक्रमात उपस्थित प्रतिनिधींना संबोधित करतील. त्यानंतर हे प्रतिनिधी लहान गटांमध्ये विभागून महाराष्ट्र, गोवा, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या सहा राज्यांना भेटी देण्यासाठी रवाना होतील. हे प्रतिनिधी तेथील निवडणूक प्रक्रिया आणि विविध मतदार संघांमध्ये संबंधित तयारीचे निरीक्षण करतील. ९ मे ला या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे.

Back to top button