देशाच्या सन्मानासाठी मोदीच हवेत : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | पुढारी

देशाच्या सन्मानासाठी मोदीच हवेत : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कागल, पुढारी वृत्तसेवा : देशाचा सन्मान वाढविण्यासाठी नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान हवेत. त्यासाठी महायुतीला मत द्या. देशाचा नेता निवडण्यासाठी कागल तालुक्यातील पालकमंत्री हसन मुश्रीफ, खा. संजय मंडलिक आणि समरजित घाटगे गटाच्या त्रिवेणी संगमामुळे संजय मंडलिक यांना उच्चांकी मताधिक्य मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. कागल शहरातील राम मंदिरासमोर झालेल्या महायुतीच्या प्रचार सभेमध्ये मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. या सभेला मोठी गर्दी झाली होती.

मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, ही निवडणूक विकासाची आणि प्रगतीची आहे. 4 जूनला महाविकास आघाडी जळून खाक होईल. मी जो शब्द देतो त्यावेळी मी स्वतःचेही ऐकत नाही. मान गादीला, मत मोदीला. सात तारखेला करेक्ट कार्यक्रम करा. धनुष्यबाणाला मत द्या. कोल्हापूर हे ऊर्जेचे स्थान आहे. शक्तिपीठ आहे. इथून ऊर्जा मिळते. कोणताही शुभारंभ कोल्हापूरमधून केला जातो. इथे खोटेपणा आणि कटकारस्थानाला स्थान नाही. देशाच्या प्रगतीसाठी मंडलिक यांना मत द्यावे. त्यांनी कुणालाही आतापर्यंत त्रास दिलेला नाही. त्यांचे हात बळकट करा, असे आवाहनही त्यांनी केले.

बाणाला मत म्हणजे नरेंद्र मोदी यांना मत, असे स्पष्ट करून ते पुढे म्हणाले, राहुल गांधी आता अमेठी सोडून पळत आहेत. स्वतःच्या विजयाची खात्री नाही ते देशाचा विकास काय करणार. 56 इंच छाती असलेले मोदी पंतप्रधान हवे आहेत. पूर्वी काँग्रेसच्या काळात बॉम्बस्फोट झाले. दंगली झाल्या. भ्रष्टाचार झाला. आता एकही भ्रष्टाचार झालेला नाही. बॉम्बस्फोट नाहीत. 24 तास काम करणारे, जीवन राष्ट्राला अर्पण करून मोदी काम करीत आहेत. स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांनी शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे नेला, तेच काम संजय मंडलिक करीत आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने स्वार्थासाठी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले. काँग्रेसची वापरा आणि फेका अशी वृत्ती आहे. मराठा समाजालाही त्यांनी वंचित ठेवले. मात्र, आमच्या सरकारने त्यांना दहा टक्के टिकणारे आरक्षण दिले. इतर समाजांना धक्का न लावता. त्यामुळे खोटे आश्वासन देणार्‍यांच्या पायाखालची वाळू आता सरकू लागली आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेले संविधान जगात सर्वश्रेष्ठ आहे. कोणीही बदलणार नाही. अफवांवर विश्वास ठेवू नका. साठ वर्षांत जे काम केले नाही ते मोदी सरकारने दहा वर्षांत केले आहे. कोल्हापूरला पूर येऊ नये, यासाठी 3,200 कोटी रुपये मंजूर करण्यात आले.

मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, कागल तालुक्यातील तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन काम केले, तर मंडलिक यांना पाडणारी शक्ती जगात निर्माण होणार नाही. लोकांच्या कल्याणाच्या योजना राबविल्या. भारतीय जनता पक्षाचे नेते समरजित घाटगे म्हणाले, काँग्रेसने देशाचे तुकडे पाडण्याचे काम केले. भारतमाता अडचणीत आणण्याचे काम केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 370 कलम रद्द करून काश्मीरच्या जनतेला दिलासा दिला. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी संयम ठेवला, तर नरेंद्र मोदी यांनी एअर स्ट्राईक केला. तीन तलाक पद्धत बंद केली.

‘सीएए’ कायद्यांतर्गत नागरिकत्व देण्याचे काम केले. संजय मंडलिक म्हणाले, नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण भागात 116 योजना राबविल्या. जनधन योजनेची दीड कोटी खाती उघडली आणि लाभार्थ्यांना थेट खात्यावर लाभ दिला. राम मंदिराची निर्मिती केली. पायाभूत विकासाची कामे केली. कोल्हापूर विमानतळ सुसज्ज झाले. टर्मिनल बिल्डिंग तयार झाली. विमानसेवा सुरू झाली. पुणे-बंगळूर सहापदरी रस्त्याचे काम सुरू झाले. उद्धव ठाकरे यांच्या काळात निधी मिळाला नाही. त्यांच्याकडे विकासाचा कोणताही मुद्दा नाही. आता देशाचे भवितव्य कोणाच्या हातात द्यायचे यासाठी निवडणूक आहे. मात्र, सध्या गलिच्छ प्रचार, कुटाळक्या केल्या जात आहेत. संसदेमध्ये 600 प्रश्न मांडले. विकासाच्या भावनेने काम केले, असे ते म्हणाले.

स्वागत संजय पाटील यांनी केले. महेश घाटगे, सुधीर पाटोळे, उत्तम पाटील, राजेंद्र तराळे, सत्यजित पाटील, भैया माने, राजेखान जमादार, रणजितसिंह पाटील, बाबासाहेब पाटील, आमदार तानाजी मुरकुटे, पक्ष प्रवक्ते राजू वाघमारे यांची भाषणे झाली. राजे बँकेचे अध्यक्ष एम. पी. पाटील, शाहू कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंग घोरपडे, अखिलेशराजे घाटगे, विवेक कुलकर्णी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

कार्यकर्त्यांत ईर्ष्या

खर्डेकर चौक येथे संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या सभेमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांचे समर्थक आणि समरजित घाटगे यांच्या समर्थकांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाली. यावेळी कार्यकर्त्यांत ईर्ष्या दिसून आली.

Back to top button