पुणे : सायबर गुन्ह्यांना ‘तारीख पे तारीख’! पोलिस ठाण्यांकडून 500 पेक्षा अधिक गुन्हे दाखल होण्याच्या प्रतीक्षेत | पुढारी

पुणे : सायबर गुन्ह्यांना 'तारीख पे तारीख'! पोलिस ठाण्यांकडून 500 पेक्षा अधिक गुन्हे दाखल होण्याच्या प्रतीक्षेत

अशोक मोराळे

पुणे : दाखल झालेल्या तक्रार अर्जाचा तपास करून संबंधित स्थानिक पोलिस ठाण्यात दाखल करण्यासाठी सायबर पोलिसांनी पाठविलेले तब्बल 500 पेक्षा अधिक गुन्हे अद्यापही पोलिस ठाण्यांनी दाखल केलेले नाहीत. मागील व चालू वर्षातील हे गुन्हे आहेत. या काळातील 600 गुन्ह्यांपैकी केवळ 90 च्या आसपास गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सायबर पोलिसांकडून गुन्ह्यांच्या संदर्भात सूचना केल्यानंतरदेखील तक्रारदारांना दाद दिली जात नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सायबर गुन्ह्यांना पोलिस ठाण्यांकडून तारीख पे तारीख दिली जात असल्याचे चित्र आहे. शहरात सायबर गुन्हेगारीचा आलेख वाढताना दिसून येतो आहे.

त्यामध्ये फसवणुकीच्या गुन्ह्यांचे प्रमाण अधिक आहे. अनेकदा सायबर गुन्ह्यातील आरोपीचे नाव निष्पन्न झालेले असले तरी त्या व्यक्तीला पोलिस ठाण्यांकडून थेट सायबर पोलिसांकडे पिटाळले जाते. सायबर पोलिसांनी गुन्ह्यांच्या संदर्भातील तांत्रिक माहिती पुरविल्यानंतर सुद्धा गुन्ह्यांच्या बाबतीत गांभिर्याने पाहिले जात नसल्याचे वास्तव आहे. ठाण्याचा गुन्हेगारी आलेख वाढू नये म्हणून प्रभारी अधिकारी काळजी घेतात. अशी काळजी घेणे गैर नाही.

मात्र, सायबर पोलिसांकडून अर्जाची चौकशी करून तांत्रिक माहिती दिल्यानंतरदेखील गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणे हे गंभीर आहे. त्यामध्ये तक्रारदार नाहक भरडला जातो. अनेकदा सायबर पोलिस ठाण्याकडून वर्ग करण्यात आलेल्या गुन्ह्याची माहितीदेखील तपास अधिकार्‍याला नसते. तक्रारदार जेव्हा अर्ज घेऊन स्थानिक पोलिस ठाण्यात जातो तेव्हा त्याच्यापुढे गुन्हा दाखल करू नये, म्हणून कारणांची जंत्रीच वाचली जाते.

पोलिस सहआयुक्तांच्या इशार्‍यानंतर बदल
सायबर पोलिस ठाण्यांकडून दाखल तक्रार अर्जाची चौकशी केल्यानंतर तांत्रिक माहिती पुरवल्यानंतरदेखील अनेकदा स्थानिक पोलिस ठाण्यांकडून गुन्हा दाखल करून घेतला जात नाही. प्रामुख्याने गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या लोन अ‍ॅपवरील फसवणुकीच्या तक्रारींबाबत हे घडत होते. हा प्रकार पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक यांच्या निदर्शनास येताच त्यांनी सर्व पोलिस ठाण्यांच्या अधिकार्‍यांची कानउघाडणी केली. एवढेच नाही तर सायबर गुन्ह्यांच्या बाबतीत जे अधिकारी व कर्मचारी चालढकल करतील त्यांना थेट कारवाईचा इशारा दिला. त्यानंतर पोलिसांनी झटपट गुन्हे दाखल करून घेण्यास सुरुवात केली आहे.

आता प्रत्येक ठाण्यात होणार सायबर तक्रारी दाखल
1 सप्टेंबरपासून सायबर तक्रारी स्थानिक पोलिस ठाण्यात दाखल करून घेतल्या जाणार आहेत. त्यासाठी शहरातील प्रत्येक पोलिस ठाण्यामधील एक अधिकारी व पाच कर्मचार्‍यांना प्रशिक्षण सुरू आहे. प्रत्येक दिवशी सरासरी शंभर तक्रार अर्ज शिवाजीनगर येथील सायबर पोलिस ठाण्यात दाखल होतात. सध्या शहरासाठी एक सायबर पोलिस ठाणे आहे. सायबर पोलिस ठाण्यांकडे अधिकारी व कर्मचारी मिळून 72 पोलिसांचे संख्याबळ आहे. सध्याची सायबर गुन्हेगारीची परिस्थिती पाहता एक पोलिस ठाणे अपुरे असल्याचे दिसते. अशात त्यांच्याकडे शिक्षक पात्रता परीक्षेपासून ते म्हाडा, आरोग्य व इतर घोटाळ्यांसह गंभीर गुन्ह्यांचा तपास सुरू आहे. तेथील अपुरे मनुष्यबळ पाहता सायबर तक्रारींचा तपास करताना त्यांची दमछाक होते. त्यामुळे पोलिस आयुक्तांनी आता हा निर्णय घेतला आहे.

येत्या 1 तारखेपासून सायबर तक्रारी प्रत्येक स्थानिक पोलिस ठाण्यात दाखल करून घेतल्या जाणार आहेत. त्या अनुषंगाने अधिकारी व कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण अंतिम टप्प्यात आहे. 25 लाख रुपयांच्या पुढील सायबर तक्रारी व काही गंभीर तक्रारी वगळता सर्व तक्रारींची दखल पोलिस ठाण्यात घेतली जाणार आहे.

                                 – डी. एस. हाके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर शाखा.

 

Back to top button