गडचिरोली : बारसेवाडा येथे जादूटाेणा केल्‍याच्‍या संशयातून महिलेसह एकाला जिवंत जाळले; १५ संशयितांना पोलीस कोठडी | पुढारी

गडचिरोली : बारसेवाडा येथे जादूटाेणा केल्‍याच्‍या संशयातून महिलेसह एकाला जिवंत जाळले; १५ संशयितांना पोलीस कोठडी

गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा : एटापल्ली तालुक्यातील बारसेवाडा गावामध्ये (दि.१) बारसेवाडा येथे अंधश्रध्देतून दोघांना जिवंत जाळल्‍याचा भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. जमनी देवाजी तेलामी (वय.५२) आणि देवू कटिया आतलामी (वय. ५७) अशी मृतांची नावे आहेत. जादुटोणा केल्याच्या संशयावरुन हा प्रकार घडला असून, या प्रकरणी एटापल्ली पोलिसांनी १५ जणांना अटक केली  आहे. न्यायालयाने संशयितांना ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

जादूटाेणा केल्‍याचा ग्रामस्‍थांना संशय

मागील काही दिवसांपूर्वी बारसेवाडा येथील आरोही बंडू तेलामी बालिकेचा आकस्‍मिक मृत्यू झाला हाेता. यानंतर गावातील काही लोक अचानक आजारीही पडले होते. जमनी तेलामी हिने जादुटोणा केल्यानेच आरोहीचा मृत्यू झाला आणि इतर जण आजारी पडले, असा ग्रामस्‍थांचा संशय हाेता. काहींनी तेलामी हिच्या घरी जावून विचारणाही केली.ला. तिने देवू आतलामी याच्‍याकडे जादुटाेणासाठी वापरलेली वस्‍तू असल्‍याचे सांगितले. ग्रामस्‍थ तेलामीला घेऊन देवूच्या घरी गेले. येथे संशयातून दोघांनाही बेदम मारहाण केली. गावाबाहेरील नाल्यात नेवून दोघांच्याही अंगावर पेट्रोल ओतून त्यांना जाळण्यात आले.

जमनीचा तेलामीचा भावाने शाहू मोहनंदा याने पोलिसांत तक्रार केली. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी या प्रकरणाची दखल घेतली. अप्पर पोलीस अधीक्षक एम.रमेश, उपविभागीय पोलिस अधिकारी चैतन्य कदम, पोलिस निरीक्षक नीळकंठ कुकडे यांनी बारसेवाडा येथे जाऊन चौकशी केली.  बारसेवाडा येथील अजय तेलामी, भाऊजी तेलामी, अमित मडावी, मिरवा तेलामी, बापू तेलामी, सोमजी तेलामी, दिनेश तेलामी, श्रीहरी तेलामी, मधुकर पोई, अमित तेलामी, गणेश हेडो, मधुकर तेलामी, देवाजी तेलामी, दिवाकर तेलामी आणि बिरजा तेलामी यांना महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा प्रतिबंधक अधिनियमान्वये अटक करण्यात आली. यातील संशयित आरोपी देवाजी तेलामी हा मृत जमनी तेलामी हिचा पती तर दिवाकर तेलामी हा मुलगा आहे. संशयित आरोपींना अहेरी येथील न्यायालयाने ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक नीळकंठ कुकडे यांनी दिली.

अंनिस पदाधिकाऱ्यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

बारसेवाडा येथील घटनेनंतर (दि.५) रोजी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुरेश झुरमुरे, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष ॲड.गोविंद भेंडारकर, मनोहर हेपट यांनी गडचिरोली येथे अप्पर पोलीस अधीक्षक एम.रमेश आणि यतीश देशमुख यांची भेट घेतली. जादुटोण्याच्या संशयावरुन दोघांना मारहाण करण्यास प्रवृत्त करणाऱ्यांवरही कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी अंनिस पदाधिकाऱ्यांनी केली. शिवाय अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाने महाराष्ट्र जादुटोणाविरोधी कायद्यासंदर्भात जनजागृती करण्याकरिता पुढाकार घेतल्यास अंनिस सहकार्य करेल, असे आश्वासनही दिले.

Back to top button