पानशेत 96 टक्के भरले; खडकवासला साखळीत 35 तासांत 3 टीएमसी पाणी | पुढारी

पानशेत 96 टक्के भरले; खडकवासला साखळीत 35 तासांत 3 टीएमसी पाणी

खडकवासला/ पुणे : रायगड जिल्ह्यालगतच्या डोंगरी पट्ट्यासह धरणक्षेत्रात सलग तिसर्‍या दिवशी पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे पानशेत (नरवीर तानाजी सागर) धरण बुधवारी (दि. 10) सायंकाळी पाच वाजता 96.31 टक्के म्हणजे जवळपास भरले. पानशेत शंभर टक्के भरून वाहू लागणार असल्याने खडकवासला धरणातून उद्या गुरुवारी मुठा नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार आहे. नदीकाठच्या रहिवाशांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या 35 तासांत खडकवासला धरण साखळीत तब्बल 3 टीएमसी पाण्याची वाढ झाली आहे. खडकवासला धरण साखळीत 25.23 टीएमसी म्हणजे 86.56 टक्के इतका पाणीसाठा झाला होता. मंगळवारी सकाळी सहा वाजता धरण साखळीत 22.38 टीएमसी पाणी होते.

खडकवासला साखळी प्रकल्प धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन ते चार दिवसांपासून संततधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे सर्वच धरणांत पाणीसाठा चांगलाच वाढला आहे. मंगळवारी सकाळी सहा ते बुधवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत टेमघर येथे 160 मिलिमीटर पाऊस पडला, तर याच कालावधीत पानशेत येथे 90, वरसगाव येथे 100 व खडकवासला येथे 14 मिलिमीटर पाऊस पडला. बुधवार सकाळपासून धरणक्षेत्रात संततधार सुरू होती.

दुपारी एकनंतर पावसाचा जोर कमी झाला. मात्र, पुन्हा सायंकाळी धामण ओहोळ, शिरकोली भागात जोरदार सरी कोसळत आहेत. दिवसभरात टेमघर येथे 60, पानशेत येथे 30, वरसगाव येथे 34 व खडकवासला येथे 5 मिलिमीटर पाऊस पडला. खडकवासला जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता योगेश भंडलकर म्हणाले, ‘पानशेत धरण जवळपास शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे खडकवासलातून पावसाच्या प्रमाणानुसार मुठा नदीत विसर्ग सोडण्यात येणार आहे.’

बुधवारी सायंकाळी पाच वाजताचा पाणीसाठा

खडकवासला
62.17 टक्के

वरसगाव
86.98 टक्के

पानशेत
96.31 टक्के

टेमघर
70.08 टक्के

Back to top button