पिंपरी : महापालिकेची 328 कोटींची, नवीन 18 मजली पर्यावरणपूरक इमारत | पुढारी

पिंपरी : महापालिकेची 328 कोटींची, नवीन 18 मजली पर्यावरणपूरक इमारत

मिलिंद कांबळे
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेची पिंपरी येथील प्रशासकीय इमारत कामकाजासाठी अपुरी पडत आहे. त्यामुळे 312 कोटी खर्चाची पर्यावरणपूरक 18 मजली प्रशस्त इमारत चिंचवड येथील सायन्स पार्कसमोरील मोकळ्या जागेत उभारली जाणार आहे. शहराची वाढती लोकसंख्या व समाविष्ट होणार्‍या नवीन गावांचा विचार करून भविष्यातील पालिकेचे विस्तारलेले कामकाज लक्षात घेऊन त्या इमारतीमध्ये विभागाची रचना असणार आहे. त्याचे प्रत्यक्ष काम लवकरच सुरू होणार आहे. पालिकेचे पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर पिंपरी येथील चार मजली मुख्य इमारत आहे. त्या इमारतीचे उद्घाटन 13 मार्च 1987 ला तत्कालिन राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांच्या हस्ते झाले.

त्या इमारतीस 35 वर्षे झाले आहेत. सन 1981 च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या 2 लाख 49 हजार 364 होती. आता ती 27 लाखांच्या पुढे गेली आहे. माण, मारुंजी, हिंजवडी, कळस, दिघी, गहुंजे, अशी गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचे नियोजन आहे. त्या गावांची तसेच, शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेतल्यास पालिकेवर नागरी सेवा पुरविण्याचा ताण पडणार आहे. सध्याची इमारत अपुरी पडत असल्याने एलबीडी, उद्यान, क्रीडा, पशुवैद्यकीय, स्मार्ट सिटी, झोपडपट्टी निर्मुलन पुनर्वसन, प्राधिकरण विशेष कक्ष, सुरक्षा, अशी अनेक कार्यालये इतर ठिकाणी आहेत. सुसज्ज पालिका भवन असावे म्हणून पालिकेच्या मागील बाजूस असलेल्या महिंद्रा कंपनीची जागा तसेच, नेहरूनगर येथील एचए कंपनीच्या जागेत उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला.

त्या जागा दर्शनी भागात नसल्याने त्या जागा रद्द करण्यात आल्या. महिंद्रा कंपनीच्या जागेबाबतची निविदा प्रक्रियाही झाली होती. अखेर, सायन्स पार्कसमोरील पालिकेच्या जागेत पालिका भवन उभारण्याचा निर्णय झाला. भाजप सत्ताकाळात त्याला मंजुरी मिळाली. निविदा प्रक्रिया मात्र, प्रशासकीय राजवटीत राबवली. निविदेची दुसरी मुदत 5 ऑगस्टला संपणार आहे. त्यानंतर इतर प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामास 3 महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

चिंचवडला लवकरच सुरू होणार प्रत्यक्ष काम

इमारत पालिकेची 33.86 एकर जागेपैकी 8.65 एकर जागेत 18 मजली पर्यावरणपूरक इमारत बांधण्यात येणार आहे. एकूण 9 लाख 65 हजार 21 स्केअर फूटचे बांधकाम केले जाणार आहे. तीन मजली बेसमेंट असणार आहे. विविध विभागात एकूण 2 हजार 689 अधिकारी व कर्मचारी बसू शकतील इतकी आसन व्यवस्था असणार आहे. चारचाकी 479 आणि दुचाकी 2 हजार 713 वाहने पार्क करता येईल, असे वाहनतळ असणार आहे. नगरसेवकांची वाढती संख्या लक्षात घेऊन त्या आकाराचे प्रशस्त सभागृह असणार आहे. एकूण 16 लिफ्टची सुविधा असणार आहे. पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर इमारत असल्याने ती नागरिकांसह, नगरसेवक, अधिकारी व कर्मचार्‍यांना सोईस्कर ठरणार आहे, असा दावा महापालिकेने केला आहे.

तीन महिन्यात निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन वर्क ऑर्डर
नवीन प्रशासकीय इमारतीची आंतरराष्ट्रीय निविदा जून महिन्यात काढण्यात आली आहे. मुदतीमध्ये दोनच निविदा प्राप्त झाल्याने 5 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन वर्क ऑर्डर दिल्यानंतर प्रत्यक्ष कामास सुरुवात होईल. त्यासाठी किमान 3 महिने लागतील, असे कार्यकारी अभियंता देवान्ना गट्टूवार यांनी सांगितले.

नव्या इमारतीमुळे शहराचा वैभवात भर पडणार
शहरातील सर्वांत मोठे व भव्य असे सिटी सेंटर उभारण्यात येणार आहे.त्या अंतर्गत महापालिकेची नवीन प्रशासकीय इमारत उभारण्यात येत आहे. ती इमारत सिटी सेंटरचा एक भाग असणार आहे. हा प्रकल्प शहराच्या नावलौकीक व वैभवात भर घालणार आहे, असे आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी सांगितले.

Back to top button