कात्रज : महादेवनगर टाकीतील पाणी चोरीला; गेल्या वीस दिवसांपासून नागरिक पाणीटंचाईने हैराण | पुढारी

कात्रज : महादेवनगर टाकीतील पाणी चोरीला; गेल्या वीस दिवसांपासून नागरिक पाणीटंचाईने हैराण

कात्रज, पुढारी वृत्तसेवा: कात्रज येथील महादेवनगर येथील पाण्याच्या टाकी मधील पाण्याची चोरी होत असून परिणामी कात्रजच्या नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. कात्रज राजीव गांधी पंपिंग स्टेशनद्वारे महादेवनगर व केदारेश्वर टाकीला 62 ते 63 एम एल डी पाणी दिले जाते. दोन्ही टाक्यांच्या अंतर्गत समान पाणीपुरवठा होणारा भाग आहे, परंतु त्यापैकी महादेवनगर येथील पाण्याच्या टाकीला फक्त 12 ते 13 एमएलडी पाणीपुरवठा केला जातो.

उर्वरित 50 एम एल डी पाणी हे केदारेश्वर पाण्याच्या टाकीला दिले जाते. त्यामुळे महादेवनगर टाकीत कमी पाणी जमा होत आहे.
महादेवनगर टाकीमधून कात्रज-कोंढवा रोड, भारतनगर, दत्तनगर, राजस सोसायटी, उत्कर्ष सोसायटी, सुखसागरनगर भाग -1, या भागाला पाणीपुरवठा केला जातो. तसेच कात्रज गावठाण, संतोषनगर व शिवशंभूनगर, गोकुळनगर या भागाला पाणीपुरवठा केला जातो. त्याचप्रमाणे केदारेश्वर टाकीमधून प्रभाग क्रमांक 41 मधील कोंढवा गावठाण, येवलेवाडी, टिळेकरनगर भागाला पाणीपुरवठा केला जातो.

बोपोडी चौकातील सिग्नल बंदच

यासंदर्भात अधिक माहिती देताना माजी नगरसेवक प्रकाश कदम म्हणाले, गेले 20 दिवस हा प्रकार सुरू आहे. कमी प्रमाणात पाणीपुरवठा केला जात असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. याबाबत आम्ही कनिष्ठ अभियंता, उपअभियंता, कार्यकारी अभियंता व अधीक्षक अभियंता यांच्याशी चर्चा केली तेव्हा,

कोणालाही या बाबतची माहिती नसल्याचे जाणविले व त्यांनीदेखील याबाबत शहानिशा केली असता, असे होत असल्याचे स्पष्ट केले. महादेवनगर टाकीचे पाणी चोरी होत असल्याची बाब गंभीर असून, पालकमंत्री अजित पवार व आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार करणार आहे, असे प्रगती फाउंडेशनचे अध्यक्ष प्रतीक कदम यांनी सांगितले.

कर्मचार्‍यांचा निष्काळजीपणा

महादेवनगरच्या टाकीचे पाणी चोरून केदारेश्वर टाकीला अधिकचे पाणी दिले जात आहे. यामुळे नागरिकांना याचा खूप त्रास सहन करावा लागतो आहे. कात्रज राजीव गांधी पंपिंग स्टेशनद्वारे होणारा पाणीपुरवठा हा पाणी सोडणारे कर्मचारी यांच्या देखरेखीखाली हा गलथान कारभार सुरू आहे का ? आणि जर असे होत असेल तर याबाबत संबंधित अधिकारी व कर्मचारी यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

महादेवनगर टाकीच्या पाणीपुरवठा लाईनला फ्लोमीटर बसवून एक आठवडा पाहणी केली जाईल. तसेच पुरवठा लाईन तपासणी सुरू केली आहे. तात्काळ बैठक घेतली असून, दोन्ही टाक्यांद्वारे नागरिकांना समान पाण्याचे नियोजन केले जाईल.

                                          -आशिष जाधव, कार्यकारी अभियंता

हेही वाचा

बोपोडी चौकातील सिग्नल बंदच

ड्रेनेज फुटल्याने नाल्यात मैलापाणी; पालिका अधिकार्‍यांचे तक्रारींकडे दुर्लक्ष

आदिवासींना मिळणार आता जागेवरच दाखले; तहसीलदार तृप्ती कोलते यांची माहिती

Back to top button