पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील विदर्भात गारपीट, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणच्या काही भागांत वादळी वारे, विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी उन्हाळी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही जोरदार पाऊस झाला.
दरम्यान, 15 मेपर्यंत राज्यात यलो आणि काही भागांत ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने जारी केला असून विदर्भाच्या काही भागांत पुन्हा गारपीट होईल, असा इशारा हवामान विभागाने वर्तविला आहे.
राज्यात अवकाळी पाऊस सुरू झाल्यामुळे उष्णतेच्या लाटेबरोबरच उकाड्यापासून थोडासा दिलासा मिळण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, गुरुवारी राज्याच्या बहुतांश भागांत वादळी वारे, विजांचा कडकडाट, तसेच मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. असाच अवकाळी पाऊस 15 मेपर्यंत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणच्या काही भागांत कोसळणार आहे. विदर्भात मात्र पुन्हा गारपीट होण्याची शक्यता आहे. नंदूरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या भागांत अवकाळी बरसण्याचे प्रमाण जास्त असणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
हेही वाचा