Menstruation and Stomach Pain : मासिक पाळी आणि पोटदुखी | पुढारी

Menstruation and Stomach Pain : मासिक पाळी आणि पोटदुखी

डॉ. प्रिया पाटील

मासिक पाळीच्या वेळी होणारी पोट दुखी ही मुलींमध्ये बर्‍याचदा असह्य असते. त्या दुखण्यामुळे त्यांच्या रोजच्या जीवनातील कामांमध्ये अडथळा येतो. तो अडथळा म्हणजे शाळा-कॉलेजला न जाणे, घरगुती काम न होणे. तसेच पोटदुखीसोबत अनेक महिलांना उलटी मळमळ चिडचिडेपणा उदासपणा वाढतो. तसेच प्रकृतीनुसार होणारे त्रास ही वेगळे असतात. या त्रासामुळे महिलांना मासिक पाळीबद्दल चीड निर्माण होते. त्याला कारणीभूत मासिक पाळी नसून जीवनातील जीवनशैलीतील झालेले बदल, अन्न घटकातील बदल व महिलांचा मूळचा स्वभाव हे कारणीभूत ठरते. त्या सर्व बाबी लक्षात घेता मासिक पाळीदरम्यान होणार्‍या पोटदुखीकडे दुर्लक्ष न करता त्यासाठी वेदना म्हणजे काय हे समजावून घेणे गरजेचे ठरते.

प्रत्येक पाळीच्या वेळी होणारी पोटदुखी म्हणजे डिस्मेनोरिया .(Dysmenorrhoea). मुख्यतः पाळीच्या वेळी प्रोस्टाग्लॉडीन हार्मोसमुळे होणार्‍या बदलांमुळे अनेकांना पोटदुखीची तक्रार राहते. हे दुखणे वयोगट पंधरा ते वीसपर्यंत जास्त प्रमाणात आढळते आणि सामान्यपणे स्त्रीबीज तयार होण्याचे हे लक्षण आहे. तसेच गर्भाशयाच्या वेगवेगळ्या आजारांमुळेसुद्धा पोटदुखी राहू शकते. उदाहरणार्थ गर्भाशयाची गाठ, गर्भाशयाला सूज, गर्भनिरोधक उपकरणे, द्विशिंगी गर्भाशय इत्यादी असू शकतात आणि हे सर्व सामान्यपणे मध्यम व चाळीशीतील महिलांमध्ये जास्त आढळते.

मासिक पाळीच्या वेळेस होणार्‍या वेदना म्हणजे गर्भ राहण्यासाठी गर्भाशयात एक आच्छादन तयार होते व गर्भ न राहिल्यामुळे ते आच्छादन रक्ताच्या रूपात योनिमार्गाद्वारे बाहेर टाकले जाते. त्यावेळी गर्भाशयाचे आवरण आकुंचन व संकुचन पावतात. त्यामुळे महिलांना या प्रक्रियेचा त्रास होतो म्हणजेच ही पाळीच्या वेळेस होणारी पोटदुखी होय.

काही महिलांना पोटदुखी सोबत पाळीच्या अगोदर उलटी, मळमळ काहींना चक्कर येणे, काहींना बद्धकोष्टता, काहींना स्तन जाड होणे, काहींना जुलाब होणे तर काहींना स्वभावात चिडचिड होणे अशा तक्रारी असतात.

तक्रारीनुसार तपासणी

– ज्या महिलांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असते, त्यांना चक्कर येणे, उलटी, मळमळ होणे असे त्रास जाणवतात, त्यांना रक्ताची तपासणी करणे गरजेचे असते. सोनोग्राफी करून गर्भाशयाचा आकार , गर्भाशयाला सूज, गर्भाशयातील गाठ, या बाबींचे निदान करणे गरजेचे असते. लघवीच्या तपासणीने लघवीचा संसर्ग आणि पांढर्‍या पदराचीही माहिती मिळते व कारणे शोधण्यास मदत होते.

– ज्या महिलांना प्रसूतीनंतरसुद्धा मासिक पाळीच्या वेदना राहतात, त्यांना तपासणीची जास्त गरज भासते. त्याचप्रमाणे तपासणीचे महत्त्व हे पेशंटचे वय शारीरिक प्रकृती आणि राहणीमान या गोष्टींवर अवलंबून असते. वरील तपासण्या डॉक्टरांच्या सल्ल्याने करणेच योग्य ठरते.
तसे पाहता, मासिक पाळीच्या वेदना काही प्रमाणात नैसर्गिक असतात; पण ज्या वेदनांमुळे मुलींना दैनंदिन गोष्टी करण्याचा अडथळा येतो व त्यांना शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवतो, तेथे त्यांना उपचाराची गरज भासते.

मासिक पाळीच्या वेदनांचे कारण जरी नैसर्गिक किंवा वयानुसार होणारे बदल जरी म्हटले तरीसुद्धा वेदनेची तीव्रता व्यक्तीगत प्रकृतीनुसार बदलत असते. कारण, बदलत्या जीवनशैलीमुळे राहणीमानात बदल करणे योग्य ठरते.

शारीरिक होणार्‍या तक्रारी या माणसाच्या जेवणाच्या सवयी व स्वभाव यावर अवलंबून असतात. मुलींमध्ये तारुण्यात होणार्‍या संप्रेरकात बदलांमुळे बरेच शारीरिक व मानसिक बदलांना सामोरे जावे लागते. त्यासाठी ज्या मुलींना पाळीच्या अगोदर चिडचिड होणे, उदास वाटणे किंवा ज्यांना मासिक पाळीच्या अगोदर जुलाब होतात, उलटी मळमळ राहते, स्तनांमध्ये जडपणा जाणवतो, अशा सर्व तक्रारींबद्दल डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घ्यावीत.

– औषधांच्या सोबत जेवणात साधारण मिठाचे प्रमाण कमी, लोह पदार्थ जास्त प्रमाणात घेणे तसेच आहारात योग्य तो बदल करून शारीरिक आरोग्य जपणे गरजेचे असते. तसेच मानसिक आरोग्यासाठी नियमित योगा किंवा चालणे ठेवणे हेसुद्धा गरजेचे आहे. जीवन शैलीतील बदलाने मुलींना व महिलांना मासिक पाळीच्या वेदनेतून दूर ठेवता येते, तर मासिक पाळी हे महिलांसाठी वरदान आहे. कारण, स्त्रीलाच मूल जन्माला देण्याचे नैसर्गिक वरदान प्राप्त आहे.

हेही वाचा 

Back to top button