मशिदीतून फतवे निघत असतील तर हिंदूंचे..: पुण्यातील सभेत राज ठाकरेंचे आवाहन | पुढारी

मशिदीतून फतवे निघत असतील तर हिंदूंचे..: पुण्यातील सभेत राज ठाकरेंचे आवाहन

पुणे : पुढारी वृत्तसेवा : आता मशिदीतून फतवे निघत आहेत की, काँग्रेसला मतदान करा. मशिदीतील मुल्ला-मौलवी हे फतवे काढत असतील तर आता मी फतवा काढतो महायुतीला मतदान करा, हिंदूंचे मोहोळ उठू द्या.. असे आवाहन मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शुक्रवारी पुणे शहरातील प्रचार सभेत केले. त्यांनी शरद पवार यांच्यावरही जाती-पातीचे राजकारण केल्याची कठोर टीका केली.
पुणे लोकसभा मतदारसंघाचे भाजप व महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ सारसबागेसमोरील रस्त्यावर मनसेप्रमुख राज ठाकरे यांची शुक्रवारी रात्री जाहीर सभा झाली.

या वेळी भाजपनेते शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, खा. मेधा कुलकर्णी, शहर अध्यक्ष धीरज घाटे, आ. माधुरी मिसाळ, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, मनसे नेते बाळा नांदगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी मनसैनिक, भाजप आणि महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज ठाकरे यांनी सुमारे 40 मिनिटांच्या भाषणात शहराच्या बकाल झालेल्या स्थितीला कोण जबाबदार आहे, शहरात जाती-पातीचे विष कोण कालवत आहे. मेट्रोचे जाळे, वाहतूक कोंडी, नवी पिढी पुणे शहर का सोडतेय अशा मुद्यांना हात घातला.
राज म्हणाले, बाबरी मशीद पाडल्यावर या देशात राम मंदिर कधी होईल, असे मला कधीच वाटले नव्हते. पण झाले राम मंदिर ते केवळ मोदींमुळे. मी केवळ स्तुती करायची म्हणून करीत नाही, मला जे पटलं ते पटलं, नाही पटलं तर मी विरोधातही बोललो आहे.

आता काँग्रेसला मतदान करा म्हणून मशिदीतून मौलवी फतवे काढत आहे. काय समजता तुम्ही मुस्लिम समाजाला, तुमच्या घरची गुरंढोरं आहेत का ती. पण काही मुस्लिम बांधव सुजाण आहेत. त्यांना कळतं काय सुरू आहे. पण मशिदीतले मुल्ला-मौलवी जर काँग्रेसला मतदान करा, उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करा म्हणून सांगत असतील तर मीही फतवा काढतो महायुतीला मतदान करा, हिंदूंचे मोहोळ उठू द्या. जेम्स लेन प्रकरण अचानक काढलं गेलं, कोण कुठला तो जेम्स लेन, तो ओरडून सांगत होता की, मी कुणालाही भेटलो नाही. इथे राम गणेश गडकरींचा पुतळा फोडला गेला ते नितीन गडकरींचे नातेवाईक आहेत म्हणून. अहो राम गणेश गडकरी कोण होते हे माहिती आहे का.. असा सवाल करीत राज ठाकरे म्हणाले, याच राजकारणाला कंटाळून नवी पिढी हे शहर, हा देश सोडून जात आहे. एकदा सर्वांनी मिळून बसूया आणि या शहराच्या विकासावर चर्चा करूया.

शरद पवारांवर टीका, अजित पवार यांची स्तुती…

ते म्हणाले, मी 1970 पासून या शहरात येतोय, किती सुंदर शहर होतं हे पण ते आता बकाल होतंय, विद्रूप होतंय याकडे लक्ष द्यायला हवं. या शहरात 1999 पासून जाती-पातीचे राजकारण सुरू झालेय, ते कुणी केलेय ते ओळखा. अहो, अजित पवार यांनी कधीही जाती-पातीचे राजकारण केलेले मी पाहिले नाही. ते शरद पवारांच्या सोबत राहिले पण, त्यांनी त्यांच्याकडून ते राजकारण घेतले नाही.

हेही वाचा

Back to top button