

किरकटवाडी : शासन आपल्या दारी या योजनेअंतर्गत सर्व विभाग एकाच ठिकाणी आणून आदिवासींना सुविधा देण्यात येणार असून त्याचा अहवाल तयार करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार तृप्ती कोलते यांनी दिली. डोणजे येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय आणि हवेली तालुका तहसीलदार कार्यालय यांनी संयुक्तपणे आदिवासी समाजातील नागरिकांसाठी विविध योजना, जातीचे दाखले, आधार कार्ड आणि रेशनिंग कार्ड जागेवरच मिळावे यासाठी शासन आपल्या दारी या कार्यक्रमांतर्गत मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यावेळी तहसीलदार कोलते यांंनी ही माहिती दिली.
'आदिवासी कातकरी समाजातील नागरिकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना त्यांची ओळख पटविण्यासाठी आणि विविध योजनांचा लाभ देण्यासाठी जातीचे दाखले मिळण्यात अनेक अडचणी येत आहेत. त्यांची शासन दप्तरी नोंद नसल्यामुळे त्यांची नोंद होणे आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही प्रत्यक्ष त्यांची माहिती घेऊन त्यांना आवश्यक दाखले, जातीचे प्रमाणपत्र देणार आहोत, असे स्पष्ट करून तहसीलदार कोलते म्हणाल्या की, 'हवेली तालुक्यातील सर्व आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणार असून एकही आदिवासी शाळाबाह्य ठरणार नाही याची काळजीही घेण्यात येणार आहे.'
या मेळाव्यात नवीन आधार कार्ड, जातीचा दाखला, नवीन रेशनिंग कार्ड, आरोग्य शिबिर, शासकीय योजनेतील ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म, आदिवासी विकास योजनांची माहिती देण्यात आली. यावेळी पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सभापती पूजा पारगे, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड, हवेलीचे उपविभागीय अधिकारी संजय आसवले यांच्यासह खडकवासला सिंहगड परिसरातील विविध गावांतील आदिवासी कातकरी समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पानशेत खोर्यात हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
हेही वाचा