‘त्यांना’ लाज वाटायला हवी; लखनौ जायंटस्च्या संजीव गोयंकांवर शमीचे टीकेचे बाण | पुढारी

‘त्यांना’ लाज वाटायला हवी; लखनौ जायंटस्च्या संजीव गोयंकांवर शमीचे टीकेचे बाण

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : लखनौ सुपर जायंटस्च्या मानहानिकारक पराभवानंतर संघमालक संजीव गोयंका प्रचंड नाराज दिसले आणि त्यांनी सामना संपताच कर्णधार के. एल. राहुलवर राग काढल्याचे पाहायला मिळाले. यावर भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीनेदेखील नाराजी व्यक्त करत त्यांना लाज वाटायला हवी, अशा शब्दांत टीकेचे बाण सोडले आहेत.

‘आयपीएल’मधील लखनौ सुपर जायंटस् संघाचे मालक संजीव गोयंका मागील दोन दिवसांपासून चर्चेत आहेत. त्यांनी लखनौचा कर्णधार के. एल. राहुलसोबत सामन्यानंतर साधलेला संवाद टीकाकारांना आमंत्रण देत आहे. बुधवारी सनरायझर्स हैदराबादने आपल्या घरच्या मैदानावर लखनौ सुपर जायंटस्चा दारूण पराभव केला. ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांच्या स्फोटक खेळीच्या जोरावर यजमान हैदराबादने 10 गडी राखून विजय साकारला. पाहुण्या लखनौने दिलेल्या 166 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादची सलामी जोडी पाहुण्यांना भारी पडली. लखनौच्या दारूण पराभवानंतर संघाचे मालक संजीव गोयंका हताश दिसले.

लखनौच्या गोलंदाजांची धुलाई होताना कॅमेरा जेव्हा जेव्हा गोयंका यांच्याकडे वळला, तेव्हा ते संतापलेले, हतबल झालेले दिसले आणि सामन्यानंतर ते के. एल. राहुलसोबत बोलतानाही रागात असल्याचे फोटोतून अंदाज बांधला जात आहे. संजीव गोयंका यांच्यावर टीका होत असताना आता भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीनेदेखील नाराजी व्यक्त करत टीकेचे बाण सोडले.

खेळाडूंना आदर द्यायला हवा

शमी म्हणाला की, खेळाडूंना आदर देणे गरजेचे असते. त्यांनी राहुलला थोडा तरी रिस्पेक्ट द्यायला हवा होता. ते संघमालक असताना असे वागतात हे अत्यंत चुकीचे आहे. तुम्हाला कोट्यवधी लोक पाहत आहेत, यातून काहीतरी शिकत आहेत. जर अशा गोष्टी खुलेआम होत असतील, तर मला वाटते की, त्यांना लाज वाटायला हवी, हे असे व्हायला नको हवे होते. जर तुम्हाला याबद्दल चर्चा करायची असेल, तर यासाठी खूप वेगवेगळे मार्ग आहेत. ड्रेसिंग रूममध्ये चर्चा केली जाऊ शकते. शमी ‘क्रिकबज’च्या एका कार्यक्रमात बोलत होता.

के. एल. राहुल हा केवळ खेळाडू नसून एक कर्णधार आहे. चूक झाली असली, तरी ती संपूर्ण संघाची आहे. जर तुमच्या नियोजनानुसार काही झाले नसेल तर सगळी चूक कर्णधाराची नसते. हा खेळ आहे, इथे काहीही होऊ शकते. चांगले, वाईट दिवस येत असतात; पण खेळाडूंचादेखील आदर करायला हवा. मैदानात जे काही झाले त्याने एक चुकीचा मेसेज गेला आहे.
– मोहम्मद शमी

Back to top button