बहाडोलीच्या पुलावरील सिग्नल यंत्रणेत बिघाड | पुढारी

बहाडोलीच्या पुलावरील सिग्नल यंत्रणेत बिघाड

मनोर:पुढारी वृत्तसेवा :  दहिसर-बहाडोली-धुकटन रस्त्यावरच्या वैतरणा खाडीवरील अरुंद पुलावरील स्वयंचलित सिग्नल यंत्रणेचा आठवडा भरापासून बोजवारा उडाला आहे. सिग्नल यंत्रणा वारंवार नादुरुस्त होऊन बंद पडत असल्याने पुलावर वाहतुकीच्या नियमनात अडथळे येत आहेत.सिग्नल यंत्रणा वारंवार बंद पडल्याने वाहनचालकांची गैरसोय निर्माण झाली आहे. गेल्या आठवड्यात सिग्नल यंत्रणेला वीजपुरवठा करणारी केबलची दुरुस्ती केल्यानंतर सिग्नल यंत्रणेला महावितरणकडून होणार वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर पर्यायी वीजपुरवठयासाठी बसवलेल्या बॅटरीत बिघाड निर्माण झाल्याने सिग्नल यंत्रणा बंद पडत असल्याची माहिती वसई विरार महापालिकेच्या अभियंत्यांनी दिली आहे.

मंगळवारपर्यंत बॅटरी मधील बिघाड दुरुस्त करून सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे सांगितले.
दहिसर-बहाडोली-धुकटन रस्त्यावर बहाडोली येथिल वैतरणा खाडीवर वसई विरार महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेसाठी पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे.पुलाच्या दोन्ही बाजूला पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. वाहतुकीसाठी अरुंद जागा उपलब्ध असल्याने एका वेळी एकच वाहन पुलाचा वाहतुकीसाठी वापर करू शकते. त्यामुळे पुलाच्या दुसर्‍या बाजूने वाहनांच्या रांगा लागत होत्या.वाहनचालकांची मोठी गैरसोय टाळण्यासाठी बहाडोलीच्या अरुंद पुलावर वसई विरार महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत स्वयंचलित सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती.

सिग्नल यंत्रणेच्या दोन्ही बाजूकडील सिग्नलच्या खांबांना वीजपुरवठा करणारी केबल नादुरुस्त झाल्याने सिग्नल यंत्रणा आठवडा भरापासून वारंवार बंद पडत होती.सिग्नल बंद पडत असल्याने वाहनचालकांची गैरसोय निर्माण झाली होती.पुलावर वाहनचालकांमध्ये वाद होत असल्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियमनासाठी पुलावर मनोर पोलीस ठाण्याकडून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान वसई विरार महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून तात्काळ दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते.केबलची दुरुस्तीचे काम पुर्ण झाल्यानंतर सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती, परंतु बॅटरीत बिघाड झाल्याने महावितरणचा वीजपुरवठा खंडित होऊन वारंवार सिग्नल यंत्रणा बंद पडत आहे. सिग्नल अभावी पुलाच्या दुतर्फा वाहनांचा रांगा लागत आहेत.

धुकटन-दहिसर मार्गावर होतेय वाहतूककोंडी
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून धुकटन ते दहिसर सुमारे आठ किलोमीटर लांबीचा रस्ता तयार करण्यात आला होता. पालघर मनोर रस्त्यावर मनोरमध्ये होत असलेल्या वाहतूककोंडीमुळे पालघर जिल्हा मुख्यालयाकडून वसई- विरार आणि मुंबई बाजूला जाणार्‍या वाहनचालकांकडून धुकटन- दहिसर-वरई रस्त्याचा वापर केला जात असल्याने वाहनांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे वाहनचालकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे.

सिग्नलच्या खांबांना वीजपुरवठा करणारी नादुरुस्त केबल दुरुस्त करण्यात आली आहे.दरम्यानच्या काळात सिग्नल यंत्रणेला पर्यायी वीजपुरवठा करण्यासाठी बसवलेल्या बॅटरीत बिघाड झाल्याने सिग्नल यंत्रणा बंद पडत आहे.नवीन बॅटरी बसवून मंगळवारपर्यंत सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करू.
सौरभ वर्तक
कनिष्ट अभियंता, वसई महापालिका

Back to top button