नाशिक : कार – दुचाकी अपघातात दोघे ठार, चांदवड-गणूर रस्त्यावरील घटना | पुढारी

नाशिक : कार - दुचाकी अपघातात दोघे ठार, चांदवड-गणूर रस्त्यावरील घटना

चांदवड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

चांदवड – गणूर रस्त्यावरील गणूर शिवारात कारने ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघे जागीच ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी गणेश बाळू ठाकरे (३२) याने चांदवड पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून कारचालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणूर येथील बाळू देवराम जाधव (५३), अरुण उत्तम गांगुर्डे व सागर कैलास ठोंबरे (२५, रा. परसूल) हे तिघे रविवारी (दि. २) रात्री 8 च्या सुमारास (एमएच १५, एफडब्ल्यू ०५३९) दुचाकीने चांदवडकडून गणूरकडे येत असताना, गणूरकडून चांदवडकडे भरधाव येत असलेल्या ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात इंडिगो कार (एमएच ४१, व्ही ३२८६) चालकाचे नियंत्रण सुटून कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात बाळू जाधव (५३), अरुण गांगुर्डे व यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर सागर कैलास ठोंबरे यांच्या हाताला, पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना चांदवड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. पोलिस उपअधीक्षक सविता गर्जे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. अपघातानंतर कारचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र जाधव अधिक तपास करीत आहे. 

हेही वाचा : 

Back to top button