Maharashtra Political Crisis | अजितदादा भेटले तर पायाच पडेन : रोहित पवार | पुढारी

Maharashtra Political Crisis | अजितदादा भेटले तर पायाच पडेन : रोहित पवार

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  राज्याच्या राजकारणात काल जे काही घडले, त्यामुळे शरद पवार काही थांबलेले नाहीत. शरद पवार थांबणारा नेता नाही. ठिकठिकाणी मोठा जनसमुदाय उसळला, हे खरं लोकांचं प्रेम आहे. पैशाची ताकद कितीही मोठी असली तरी लोकांच्या ताकदीसमोर कुठलीही ताकद मोठी नाही. येत्या काळात साहेबांची ताकद व लोकांची ताकद किती मोठी आहे हे दिसणार आहे. अजितदादा भेटले तर मी त्यांचे पाय धरीन, अशा शब्दात आ. रोहित पवार यांनी पक्षातील बंडाळीवर भाष्य केले. दरम्यान, काका म्हणून त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे मनाला खूप वाईट वाटत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. (Maharashtra Political Crisis)

सातार्‍यात रयत शिक्षण संस्थेत पत्रकारांशी बोलताना आ. रोहित पवार म्हणाले, कुटुंब म्हणून एकत्रीत जी ताकद असते ती खरी ताकद असते. भाजपने उध्दव ठाकरेंची पार्टी फोडली. एका वर्षातच राष्ट्रवादीला फोडण्याचा प्रयत्न भाजपाकडून झाला आहे. येत्या काळात हा प्रयत्न काँग्रेसबद्दल होणार नाही हे आपल्याला सांगता येणार नाही. भाजपावरील लोकांचा विश्वास उडून गेला आहे. काल जे काय घडलं त्यामुळे शरद पवार घरात थांबले नाहीत. ते थेट सामान्य जनतेत जावून मिसळले आहेत. ते कराड येथे येत असल्याचे समजल्यानेच स्वत:हून लोकं मोठ्या संख्येने जमा झाले. हे खरं लोकांचे प्रेम आहे. पैशाची ताकद कितीही मोठी असली तरी लोकांच्या ताकदीसमोर कुठलीही ताकद मोठी नाही हे आज सर्वांना कराड येथे दिसले.

आ. रोहित पवार म्हणाले, अजित पवारांना मी विनंती करु शकतो कारण ते मोठे नेते आहेत. त्यांचा अनुभव जास्त आहे. अशा परिस्थितीत विनंती करण्याशिवाय मी दुसरे काहीच करू शकत नाही. शरद पवार व महाराष्ट्र एका विचाराला धरुन आहेत. भाजपा व मित्र पक्षाने गेल्या काही महिन्यांपासून अनेक थोर व्यक्तींचा अवमान केला तरी त्यांचे वरिष्ठ नेते गप्प बसले. आम्ही आवाज उठवला, विरोध केला. त्यांच्या विरोधात बोललो पण अशाच लोकांबरोबर जाणे कितपत योग्य, असा प्रश्न सामान्य लोकांना पडला आहे.
जे काय आमदार मुंबईमध्ये काल दिसले. त्यांना वेगळ्या काही गोष्टी सांगण्यात आल्या होत्या, असे स्पष्ट करून आ. रोहित पवार म्हणाले, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बदलायची चर्चा काही दिवसांपूर्वी झाली होती. शरद पवार हे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांना विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय घेत नाहीत. त्यानुसार पाच तारीख ठरवण्यात आली होती.

सहा तारखेच्या बैठकी संदर्भात व प्रदेशाध्यक्षांच्या निवडीबाबत चर्चा करायची आहे, असे सांगून सर्व आमदारांना मुंबईला बोलवले गेले होते. नतंर जे काय घडलं ते अनेक आमदारांसाठी वेगळं आणि नवीन होते. तिथे बैठकीत होते म्हणून आमदारांनी विचार सोडला असे आपल्याला बोलता येणार नाही. कोणालाही फसवून बोलावले गेले नव्हते. त्यांना बैठकीचे कारण देवूनच बोलावले गेले होते. मात्र बैठकीवेळी सह्या घेतल्यानंतर सर्व आमदारांना राजभवन बघावे लागले. जे आमदार देवगिरीवर होते ते राजभवनात गेले असेही नाही. अनेक आमदार आधीच त्या ठिकाणाहून निघून आले. आमदारांच्या मनामध्ये काय आहे, हे आज आपल्याला काही सांगता येणार नाही. कोणाच्या मनामध्ये दोन विचार असतील तर ते सुध्दा योग्य विचार करुन पाच तारखेला शरद पवारांबरोबर येतील, असा विश्वासही आ. रोहित पवार यांनी व्यक्त केला. (Maharashtra Political Crisis)

दादांना पुन्हा माघारी येण्याची हाक…

ज्या नेत्यांना शरद पवारांनी ताकद दिली, विविध पदे दिली. पदे घेवून सगळं भोगून ते आज सत्तेत जात असतील तर ते स्वत:साठी जात असतील असं लोकाचं व आमचं मत आहे. जे स्वत:चा विचार करतात त्यांचा आम्ही विचार करत नाही. माध्यमांच्या माध्यमातून अजितदादांना पुन्हा येण्याची हाक देत आहोत. ते शेवटी मोठे नेते आहेत. त्यांनी घेतलेला निर्णय विचार करून घेतला असेल. मात्र, त्यांना विनंती करण्याची जबाबदारी आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांची आहे, असेही आ. रोहित पवार म्हणाले.

शरद पवार यांच्या बरोबरच राहणार

शरद पवारांना भेटण्यासाठी व धीर देण्यासाठी मोठ्या संख्येने लोकं आले आहेत. शरद पवार ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी लोकं जातील. जिथे लोकं असतील, शरद पवार असतील त्या ठिकाणी बरोबर राहणार असल्याचे आ. रोहित पवार यांनी सांगितले.

Back to top button