गिरीश महाजन मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत ; एकनाथ खडसेंचा खोचक टोला | पुढारी

गिरीश महाजन मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत ; एकनाथ खडसेंचा खोचक टोला

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

मी भाजपचा आमदार असताना गिरीश महाजनांना पक्षात कुठेही स्थान नव्हते. सरपंच असताना त्यांना मी गल्लोगल्ली फिरवले. महाजन यांची कोणतीही प्रचारसभा माझ्याशिवाय पार पडली नाही. गिरीश महाजन आता मोठे झाले आहेत. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहे, असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. एकनाथ खडसे यांनी मंत्री महाजनांना लगावला आहे.

ग्रामविकासमंत्री महाजन यांच्यावर टीका करताना आ. खडसे म्हणाले, गिरीश महाजन मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. देवेंद्र फडणवीस यांचा वारस म्हणून गिरीश महाजन यांचे नाव पुढे यायला लागले आहे. गिरीश महाजन अशा प्रसंगांमध्ये अडकलेले होते की, त्या प्रसंगांमधून त्यांना मी बाहेर काढले. त्यांना मी बाहेर काढले नसते तर ते महाराष्ट्रातही दिसू शकले नसते, अशा शब्दांत आ. खडसेंनी टीका केली.

मी मुख्यमंत्री पदाचा दावेदार होतो

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते की, देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांना मंत्रिमंडळात सात खाते दिले होते. तरी ते म्हणत असतील भाजपत काही मिळालं नाही, तर मग राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊन त्यांना काय मिळाले? असा सवाल केला होता. यावरही आ. खडसे म्हणाले, मंत्रिमंडळात मला सात, तर १२ खाते दिले गेले होते. कारण तेव्हा मी मुख्यमंत्रिपदाचा दावेदार होतो. मुख्यमंत्रिपदासाठी मी उठाव करू नये म्हणून मला १२ किंवा १५ खाते घ्या, असे सांगितले होते. मला सांगितले होते तुम्हाला हवे ते घ्या आणि मंत्रिमंडळात या. तसेच ही खाती मला फडणवीस यांनी दिली नव्हती तर, परिस्थितीनुसार ती देणे त्यांना भाग पडले होते, असा दावा खडसे यांनी केला. फडणविसांना माझ्यामुळेच अध्यक्षपद मिळाले. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या आग्रहास्तव मी देवेंद्र फडणवीस यांना अध्यक्षपद द्यायला लावले, असाही दावा खडसे यांनी केला.

हेही वाचा :

Back to top button