WTC Final 2023 : कसोटी ‘चॅम्पियन’ कोण?;भारत-ऑस्ट्रेलिया आजपासून फायनलमध्ये भिडणार | पुढारी

WTC Final 2023 : कसोटी ‘चॅम्पियन’ कोण?;भारत-ऑस्ट्रेलिया आजपासून फायनलमध्ये भिडणार

लंडन; वृत्तसंस्था : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ‘कसोटी चॅम्पियन’ कोण? यासाठी आजपासून अंतिम लढाई रंगणार आहे. लंडनच्या ओव्हल मैदानावर होणारी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप जिंकून भारत आपला आयसीसी ट्रॉफीचा दशकाचा दुष्काळ संपवण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे; तर ऑस्ट्रेलिया संघ तिन्ही प्रकारचे वर्ल्डकप आपल्या नावावर करणारा पहिला देश होण्यासाठी धडपड करणार आहे. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या चार मालिका जिंकून त्यांच्यावर वर्चस्व गाजवले आहे. आता या शेवटच्या आणि निर्णायक सामन्यात बाजी कोण मारतो आणि कसोटीचा वर्ल्ड चॅम्पियन कोण होतो, हे इंग्लंडच्या भूमीत ठरणार आहे. (WTC Final 2023)

दोन्ही संघ या एकमेव कसोटी सामन्यासाठी काही आठवडे आधीच इंग्लंडमध्ये दाखल झाले होते. दोन्ही संघांनी कसून सराव करत वातावरणाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. (WTC Final 2023)

ऑस्ट्रेलियाने डब्ल्यूटीसी पॉईंट टेबलमध्ये 152 गुणांसह अव्वल स्थान पटकावले होते; तर भारतीय संघ 127 अंक घेत दुसर्‍या स्थानावर राहिला होता. आता या दोन्ही संघांत अजिंक्यपदासाठी लढत होणार आहे. ऑस्ट्रेलिया संघ पहिल्यांदाच फायनलमध्ये आला आहे, तर भारतीय संघ हा सलग दुसर्‍यांदा फायनल खेळत आहे. (WTC Final 2023)

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला गेल्या काही सामन्यांत पराभूत केल्याने त्यांचे पारडे किंचित जड आहे. मात्र, भारतीय संघ गेल्या काही वर्षांपासून आयसीसीच्या स्पर्धांमध्ये अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकलेला नाही. भारताने तीन सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत ऑस्ट्रेलियाचा 2-1 असा पराभव केला होता.

सामना इंग्लंडमध्ये असल्याने सामन्यात वेगवान गोलंदाजांची भूमिका ही मोठी असणार आहे. भारताकडे मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव अन् शार्दूल ठाकूर ही वेगवान गोलंदाजांची फळी आहे. आता सामन्यात रोहित शर्मा तीन वेगवान गोलंदाज, दोन फिरकीपटू खेळवणार की, चार वेगवान गोलंदाज अन् एक फिरकीपटू खेळवणार, हे सामन्या दिवशीच कळेल. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाकडे पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, स्कॉट बोलँड या तगड्या वेगवान गोलंदाजांचा समावेश आहे.

इतिहासात पहिल्यांदाच ओव्हलवर जूनमध्ये सामना होत आहे. त्यामुळे खेळपट्टी फ्रेश असेल. त्याचा साहजिकच फायदा हा वेगवान गोलंदाजांना होणार आहे. खेळपट्टीची धाटणी ही ऑस्ट्रेलियातील खेळपट्टीसारखीच असली, तरी सामना कुकाबुरा चेंडूवर नाही, तर ड्यूक चेंडूवर होणार आहे. त्यामुळे ज्या संघाच्या वेगवान गोलंदाजांनी चांगला मारा केला त्या संघाची सरशी होणार.

सामन्याची सूत्रे अष्टपैलूंच्या हातात :

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यात कोणता संघ विरोधी संघाच्या वेगवान मार्‍याचा यशस्वी सामना करतो, यावर जय-पराजय ठरणार आहे. मात्र, याचबरोबर या सामन्यात अष्टपैलू खेळाडूंचीदेखील महत्त्वाची भूमिका असणार आहे. या सामन्यात एखाद्या संघाची फलंदाजी ढेपाळू शकते किंवा प्रमुख गोलंदाज निष्प्रभ ठरू शकतात. अशावेळी अष्टपैलू खेळाडू फक्त संघाला सावरू शकतो असे नाही, तर त्याची चांगली कामगिरी ही संघाला विजयदेखील मिळवून देऊ शकते.

स्कॉट बोलँडचा ऑस्ट्रेलिया संघात समावेश :

भारताविरोधात होणार्‍या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराने आपल्या संभाव्य संघाविषयी सूतोवाच केले असून, वेगवान गोलंदाज स्कॉट बोलँडचा ऑस्ट्रेलियाच्या प्लेईंग 11 मध्ये समावेश करणार आहेत; तर मायकल नेसरला हेजलवूडच्या जागेवर टीममध्ये सामील केले होते; पण त्याला संधी मिळणार नाही. 7 जूनला लंडनच्या ओव्हल मैदानात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा सामना होणार आहे. कमिन्सने सांगितले की, भारताविरोधात होणार्‍या फायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ पाच फलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीन, विकेटकिपर अ‍ॅलेक्स कॅरी, तीन वेगवान गोलंदाज आणि एका फिरकीपटूसोबत मैदानात उतरू शकतो.

सामन्यापूर्वी निवडणार अंतिम संघ : रोहित शर्मा

लंडनच्या ओव्हल मैदानावर आज (7 जून) पासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना होणार आहे. या चुरशीच्या सामन्यासाठी टीम इंडियाची रणनीती काय असेल, यावर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, दोन फिरकीपटूंना टीममध्ये घेण्याचा निर्णय आम्ही उद्या ठरवू. इथली खेळपट्टी रोज बदलतेय हे ध्यानात घेऊन संघ निवडावा लागेल. आम्ही सर्व 15 खेळाडूंना तयार राहण्यास सांगितले आहे. भारतीय क्रिकेटला पुढे नेण्याचे आणि जास्तीत जास्त सामने आणि ही चॅम्पियनशिप जिंकण्याचे काम मला मिळाले आहे, ते काम प्रामाणिकपणे करू.

शुभमनला सल्ल्याची गरज नाही :

पत्रकार परिषदेत रोहितला शुबमन गिलबद्दल प्रश्न विचारला असता तो म्हणाला की, त्याला कोणत्याही सल्ल्याची गरज नाही. त्याने आयपीएलमध्ये मोठी कामगिरी केली आहे. शुभमन हा अत्यंत आत्मविश्वासी खेळाडू आहे. तो खेळपट्टीवर जास्तीत जास्त वेळ घालवेल, अशी आशा संघाला आहे.

क्रिकेट तज्ज्ञांवर भाष्य :

रोहित पुढे म्हणाला, क्रिकेट तज्ज्ञ अनेक गोष्टींबद्दल बोलतात; पण कोणत्या संघाने उत्तम कामगिरी केली, हे पाच दिवसांनंतरच कळेल. प्रथमच आयसीसी टूर्नामेंटच्या अंतिम फेरीत टीम इंडियाचे कर्णधारपद भूषवणार्‍या रोहितने स्पष्टपणे सांगितले की, मी या सामन्याबाबत जास्त विचार करत नाही. खूप विचार करून स्वत:वर जास्त दडपण घ्यायचे नाही.

स्टार स्पोर्टस्वरून थेट प्रक्षेपण :

ओव्हलवर होणार्‍या डब्ल्यूटीसी फायनल 2023 चे भारतात आणि ऑस्ट्रेलियात थेट प्रक्षेपण हे स्टार स्पोर्टस् नेटवर्कवर होणार आहे. सामना हा भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरू होईल. सामन्याचे प्रक्षेपण स्टार स्पोर्टस् 1, स्टार स्पोर्टस् 2, स्टार स्पोर्टस् 3, स्टार स्पोर्टस् 1 हिंदी, स्टार स्पोर्टस् 1 एचडी, स्टार स्पोर्टस् 2 एचडी, स्टार स्पोर्टस् 1 हिंदी एचडी, स्टार स्पोर्टस् 1 तमिळ, स्टार स्पोर्टस् 1 तेलगू आणि स्टार स्पोर्टस् 1 कन्नडा या चॅनेलवरून होणार आहे.

डिस्ने प्लस हॉटस्टारवर लाईव्ह स्ट्रीमिंग :

हा सामना टी.व्ही.सोबतच डिजिटल प्लॅटफॉर्मवरदेखील पाहावयास मिळणार आहे. या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग हे डिस्ने प्लस हॉटस्टारच्या अ‍ॅप आणि वेबसाईटवरून करण्यात येणार आहे.

सामन्याची वेळ : दुपारी 3 वाजता.

हेही वाचा;

Back to top button