#WTCFinal : 143 वर्षांत पहिल्यांदाच ‘ओव्हल’वर जून महिन्यात सामना, जाणून घ्या इतिहास | पुढारी

#WTCFinal : 143 वर्षांत पहिल्यांदाच ‘ओव्हल’वर जून महिन्यात सामना, जाणून घ्या इतिहास

पुढारी ऑनलाईन डेस्क : #WTCFinal Oval History : इंग्लंडमधील प्रसिद्ध अशा ओव्हल मैदानावर आजपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात (7 जून) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल मॅच सुरू होत आहे. ही लढत चुरशीची होईल, अशी आशा आहे. ओव्हल हे जगातील दुसर्‍या क्रमांकाचे क्रिकेट मैदान आहे. येथे आतापर्यंत 104 कसोटी सामने खेळवण्यात आले आहेत. इंग्लंडमध्ये जूनपासून उन्हाळा सुरू होतो. या हंगामाचा शेवट म्हणजे सप्टेंबर महिना; पण या मैदानावर 143 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच जून महिन्यात कसोटी खेळवण्यात येत आहे.

ओव्हलच्या मैदानावर यापूर्वी कधीच जून महिन्यात सामना खेळवण्यात आलेला नाही. येथे खेळले गेलेले सर्व कसोटी सामने हे जुलैच्या उत्तरार्धात किंवा ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पार पडले आहेत. 1982 मध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील एक कसोटी ही ओव्हलच्या इतिहासातील आजवरची खूप लवकर खेळवली गेलेली कसोटी आहे. हा सामना 8 जुलै रोजी सुरू झाला होता. तो सामना अनिर्णित राहिला होता. (#WTCFinal Oval History)

ओव्हलवर आतापर्यंत 104 कसोटी सामने खेळले गेले आहेत. यापैकी जुलैमध्ये येथे केवळ आठ कसोटी खेळल्या गेल्या आहेत. सप्टेंबर महिन्यात सात सामने झाले. उर्वरित 89 सामने ऑगस्टमध्ये खेळवण्यात आले आहेत. 1880 मध्ये ओव्हलवर प्रथमच कसोटी खेळली गेली. त्यावेळी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना झाला होता, ज्यात इंग्लिश संघाने पाच विकेट्स राखून विजय मिळवला.

ओव्हलवरील शेवटचे चार सामने हे उन्हाळ्याच्या शेवटी सप्टेंबर महिन्यात खेळवण्यात आले आहेत. गेल्या 30 वर्षांचा विचार करता फक्त दोन (2012 आणि 2017) कसोटी सामने ऑगस्टमध्ये खेळवण्यात आले आहेत. 2023 मध्ये ओव्हलवर खेळवण्यात आलेल्या तीन चॅम्पियनशिप सामन्यांत होम टीम असलेल्या सरे संघाने जिंकल्या आहेत. विशेष म्हणजे, तिन्ही वेळेला सरे संघाने दुसर्‍यांदा फलंदाजी केली होती. विशेष म्हणजे, तिन्ही सामन्यांत वेगवान गोलंदाजांनी 90 विकेटस् घेतल्या आहेत. (#WTCFinal Oval History)

सामना पुढे जाईल तशी ओव्हलची खेळपट्टी फलंदाजीला पोषक

ओव्हलवर पहिल्या डावाची सरासरी धावसंख्या 269 इतकी आहे. दुसर्‍या डावात ही सरासरी 280 पर्यंत गेली आहे, तर तिसर्‍या डावात ही सरासरी वाढून 326 इतकी झाली आहे. दिवसाप्रमाणे फलंदाजांची सरासरी पाहिली, तर पहिल्या दिवशी 28.26, दुसर्‍या दिवशी 31.70, तर तिसर्‍या दिवशी 32.18 अशी वाढत गेली आहे. याचाच अर्थ कसोटी सामना जसजसा पुढे जाईल तशी ओव्हलची खेळपट्टी फलंदाजीला पोषक ठरत गेली आहे. (WTC Final 2023)

ओव्हल मैदानाचे रेकॉर्ड : (#WTCFinal Oval History)

एकूण मॅच : 104
होम टीम (इंग्लंड) चा विजय : 43 वेळा
प्रथम फलंदाजी करून विजय : 37 वेळा
पाहुण्या संघाचा विजय : 23 वेळा
ड्रॉ मॅच : 37
सर्वोच्च धावसंख्या : 1938 इंग्लंडविरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या 7 बाद 903
कमी धावसंख्या : ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंग्लंड 44 धावांवर ऑलआऊट

कसे असेल खेळपट्टीचे स्वरूप?

द ओव्हल मैदानाच्या नावावर कसोटी क्रिकेटमधील एक मोठा विक्रम आहे. हे मैदान सर्वाधिक कसोटी सामने झालेल्या मैदानांच्या यादीत पहिल्या 5 मध्ये येते. असे असले तरी येथील पिचबाबत कोणताही अंदाज लावता येत नाही. पिचवर गवत दिसत असल्याने असा अंदाज लावला जात आहे की, सुरुवातीला जलद गोलंदाजांना मदत मिळेल. इंग्लंडमध्ये हवामान नेहमी बदलत राहते. त्यामुळेच पिचवर गोलंदाजी आणि फलंदाजी दोघांना मदत मिळत राहते. यामुळेच टॉस जिंकणे निर्णायक ठरते.

मॅचच्या अखेरच्या दोन दिवशी पिच कोरडे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे फिरकीपटूंना मदत मिळू शकते. याआधीच्या कसोटीत असे पाहायला मिळाले आहे. त्यामुळेच अधिकतर संघ टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा पर्याय निवडतात.

खेळपट्टी की ग्रीन कार्पेट?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील फायनल गवताने भरलेल्या हिरव्यागार खेळपट्टीवर होणार आहे. खेळपट्टी इतकी हिरवीगार आहे की, ती खेळपट्टी आहे की, मैदानाचा कुठला तरी हे भाग समजत नाही. ही खेळपट्टी पाहून फलंदाजांना फार आनंद झाला नसेल; पण दुसरीकडे वेगवान गोलंदाजांना आनंदाच्या उकळ्या फुटत असतील. ढगाळ वातावरणात ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी सोन्यापेक्षा कमी नाही. येथे चेंडू जोरदार स्विंग होण्याची शक्यता आहे.

गेल्या 10 वर्षात भारताने 3 आयसीसी फायनल गमावल्या

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2013 साली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर भारतीय संघाने एकही आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही. गेल्या 10 वर्षांत टीम इंडियाने तीन आयसीसी ट्रॉफी फायनल गमावल्या आहेत. 2014 च्या टी-20 विश्वचषक फायनलमध्ये श्रीलंका, 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पाकिस्तान, 2021 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये न्यूझीलंडने भारताचा पराभन केला आहे.

Back to top button