नाशिक : कोमातील रुग्णाला ‘नामको’त मिळाले जीवदान | पुढारी

नाशिक : कोमातील रुग्णाला 'नामको'त मिळाले जीवदान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

उंचावरून पडून मेंदूला मार लागल्याने गंभीर जखमी झालेल्या बांधकाम मजुराला नामको हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी जीवदान दिले. एका आर्थिक दुर्बल रुग्णावर आपल्या अनुभवातून उपचार करत जीवदान देणाऱ्या डॉक्टरांसह हॉस्पिटलचे आभार मानताना रुग्णाच्या नातेवाइकांना अश्रू अनावर झाले होते.

पंचवटीतील हमालवाडी भागात राहणारा एक ३८ वर्षीय कामगार २६ फेब्रुवारीला बांधकाम साइटवर काम करताना तोल जाऊन खाली पडला होता. त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला तातडीने नजीकच्या खासगी रुग्णालयात नेले होते. मात्र, रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याचे पाहून त्या रुग्णालयाने दाखल करून घेण्यास नकार दिला होता. त्याच्यावर तातडीने उपचारांची गरज असल्याने त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला नामको हॉस्पिटलमध्ये दाखल केले. रुग्णालयातील निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लगेचच रुग्णावर आयसीयूमध्ये उपचार सुरू केले. मेंदूत रक्तस्राव झाल्याने रुग्ण बेशुद्धावस्थेत होता. तसेच, त्याच्या शरीराच्या उजव्या बाजूला अर्धांगवायूचा झटका आला होता.

प्राथमिक उपचारांनंतर मेंदूचा सिटीस्कॅन केला असता, मेंदूच्या डाव्या बाजूला रक्तस्राव आढळून आला. त्यामुळे नामको हॉस्पिटलचे मेंदूरोग सर्जन डॉ. सुमित हिरे यांचा सल्ला घेण्यात आला. रुग्णाच्या जिवाला धोका असल्याची व कोणत्याही क्षणी शस्त्रक्रियेची गरज लागणार असल्याची माहिती रुग्णाच्या नातेवाइकांना देण्यात आली. उपचारांना प्रतिसाद मिळत नसल्याने रुग्णाची परिस्थिती खालावत चालली होती. डॉ. हिरे व न्यूरोफिजिशियन डॉ. अनुज नेहते यांनी त्याच्यावर यशस्वीपणे मेंदू शस्त्रक्रिया केली. मेंदूच्या आतील रक्तस्राव कमी करून कवटीच्या आतला दाब कमी करून जास्तीत जास्त मेंदू पेशी वाचवण्याचा प्रयत्न केला. किचकट मेंदू शस्त्रक्रियेत भूलतज्ज्ञ डॉ. भूषण वडनेरे, फिजिशियन डॉ. प्रशांत सोनवणे, सीएमओ डॉ. अनिस शेख, शस्त्रक्रिया सहायक डॉ. योगेश गोसावी यांचीही भूमिका महत्त्वाची ठरली. दरम्यान, नामको ट्रस्टचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी, सचिव शशिकांत पारख व पदाधिकाऱ्यांनी कोमात गेलेल्या मजुराला जीवदान देणाऱ्या संपूर्ण टीमचे कौतुक केले.

…अन् रुग्णाने उघडले डोळे
मेंदू शस्त्रक्रियेनंतर तीन-चार दिवसांनी रुग्णाने डोळे उघडत प्रतिसाद दिला. त्याला बोलणेही समजू लागले. शस्त्रक्रियेनंतर पाचव्या दिवशी रुग्णाचे व्हेंटिलेटर काढण्यात आले. आठवडाभरात आयसीयूमधून रुग्ण बाहेर आला. या कालावधीत अर्धांगवायूचा प्रभावही कमी होऊन प्रकृतीत सुधारणा होत गेली. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने शासकीय योजने अंतर्गत त्याच्यावर संपूर्ण उपचार शक्य झाल्याचे रूग्णालयाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा:

Back to top button