

नगर : पुढारी वृत्तसेवा : क्रेडीट कार्ड वापरणार्या एका नोकरदाराची फसव्या लिंकच्या आधारे दीड लाखांनी फसवणूक झाली आहे. रिवार्डसाठी मोबाईलवर आलेली लिंक उघडताच बँक खात्यातून दीड लाख काढून घेण्यात आल्याची फिर्याद कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. कोतवाली पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सुनील ज्ञानदेव हाडके (रा.विद्या टॉवर,कल्याण रोड) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
सुनील हाडके यांचे एचडीएफसी बँकेत खाते असून, ते क्रेडीट कार्डचा वापर करतात. शुक्रवारी (दि.7) हाडके यांच्या मोबाईलवर एक रिवॉर्डसाठी लिंक आली. लिंक ओपन करताच मोबाईवर दोन ते तीन ओटीपी आले. हाडके यांना संशय आल्याने त्यांनी ओटीपी शेअर केले नाही. त्यानंतर काही वेळातच बँक खात्यातून दीड लाख रूपये काढल्याचा मेसेज हाडके यांना आला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर कोतवाली पोलिस ठाण्यात त्यांनी फिर्याद दिली. पुढील तपास कोतवाली पोलिस करीत आहेत.