बेळगाव : हल्याळ्यात घुमतोय मराठीत प्रचार! | पुढारी

बेळगाव : हल्याळ्यात घुमतोय मराठीत प्रचार!

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  आठवेळा आमदार, मंत्री म्हणून काम केलेले आणि सध्याच्या सभागृहात सर्वात ज्येष्ठ सदस्य असलेले आणि आता दहाव्यांना निवडणुकीला सामोरे जाणारे काँग्रेसचे उमेदवार आर. व्ही. देशपांडे यांनी मतदारांना मराठीतून साद घातली आहे. हल्याळ मतदारसंघात मराठीतून प्रचार करण्यात येत आहे. सोशल मीडियावर हा व्हीडीओ व्हायरल झाला आहे.

हल्याळ हा सर्वाधिक मराठी भाषिक असलेला भाग आहे. 1956 साली बेळगाव, खानापूरपेक्षाही हल्याळमध्ये मराठी टक्का अधिक होता. त्यामुळे महाराष्ट्राने कारवार जिल्ह्यातील हल्याळवर दावा सांगितला आहे. कालांतराने महाराष्ट्र एकीकरण समितीचे वर्चस्व या भागातून कमी झाले असले तरी मराठी माणसांचे अस्तित्व आहे. त्यामुळे मतदारांना मराठीतून साद घालण्यात येत आहे. निवडणूक आली की सीमाभागातील सर्वच मतदारसंघात मराठीचा वापर करण्यात येतो. राष्ट्रीय पक्षांना मराठी भाषेचे आठवण होते आणि उमेदवारांपासून कार्यकर्ते मराठीत भाषणे झाडू लागतात. त्याचा मतदारांवर प्रभावही पडतो. त्यामुळे मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी मराठीचा आधार घ्यावा लागतो, हे वारंवार सिद्ध झाले आहे.

हल्याळ परिसर कारवार आणि गोव्याच्या सीमेवर आहे. त्यामुळे मराठीचा प्रभाव अधिक आहे. परिणामी राजकीय पक्षांना मराठीचा आधार घ्यावा लागतो. परिसरात मराठी शाळा कमी झाल्या असल्यामुळे घरोघरी आणि सार्वजनिक ठिकाणी मराठीचाच वापर होतो. त्यामुळे राजकारणी लोकांना मराठीतून संवाद साधावा लागतो. काँग्रेस उमेदवार आर. व्ही. देशपांडे हे मराठी जाणकार आहेत. मराठीतून ते संवाद साधतात. तसेच इतर राष्ट्रीय पक्षातील उमेदवारही मराठीची जाण असणारेच असतात. अनेकदा मराठा समाजातील उमेदवारांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे.

सीमाभागात मराठी भाषिकांचेच वर्चस्व

सीमावादामुळे बेळगाव, खानापूर परिसरात मराठीचा वापर केला तर कन्नडिगांकडून आणि प्रशासनाकडून आडकाठी आणली जाते. त्यामुळे निवडणूक जवळ आली तरच मराठीचा जयजयकार करणारे राजकारणी बेळगाव परिसरात अधिक आहेत. त्यांना मतांसाठी मराठीची गरज पडते आणि मराठी लोकांच्या हक्काचा प्रश्न येतो, त्यावेळी मूग गिळून गप्प बसलेले असतात, असे चित्र आहे. पण, सीमाभागात मराठी भाषिकांचेच वर्चस्व आहे, हे मात्र कोणालाही नाकारता येणार आहे. कितीही आकडेवारी लपवण्याचा प्रयत्न केला, कानडीकरणाचा घाट घातला तरी मराठी माणसाचे अस्तित्व दिसून येणारच, हे हल्याळ येथील मराठी भाषेतून प्रचारातून दिसून येते.

Back to top button