‘बिरसा मुंडा कृषी’तून पुणे जिल्ह्यात 58 लाखांचे अनुदान वाटप | पुढारी

‘बिरसा मुंडा कृषी’तून पुणे जिल्ह्यात 58 लाखांचे अनुदान वाटप

पुणे; पुढारी वृत्तसेवा : अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकर्‍यांना सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचा 2022-23 या वर्षी पुणे जिल्ह्यातील 50 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला असून, 58 लाख 65 हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने दिली.

आदिवासी उपयोजना क्षेत्रांतर्गत (टी.एस.पी.) आणि आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील (ओ.टी.एस.पी.) अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकर्‍यांसाठी ही राज्यपुरस्कृत योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत नवीन विहिरीसाठी 2 लाख 50 हजार रुपये, जुनी विहीर दुरुस्ती 50 हजार, शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण 1 लाख, इनवेल बोअरिंग व पंपसंचासाठी प्रत्येकी 20 हजार रुपये, वीजजोडणी आकार 10 हजार रुपये तसेच सूक्ष्म सिंचन संचअंतर्गत तुषार संच 25 हजार रुपये किंवा ठिबक सिंच 50 हजार रुपये, एचडीपीई किंवा पीव्हीसी पाइप्स 30 हजार रुपये, परसबाग 500 रुपये या मर्यादेत अनुदान वितरित करण्यात येते. पुणे जिल्ह्यात टी.एस.पी. क्षेत्रात 41 लाभार्थ्यांना 51 लाख 3 हजार रुपये, तर आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील (ओ.टी.एस.पी.) 9 लाभार्थ्यांना 7 लाख 62 हजार रुपयांचे अनुदान या योजनेंतर्गत देण्यात आले आहे.

Back to top button