नाशिक : अवकाळीमुळे जिल्ह्यात साडेपाच हजार हेक्टरचे नुकसान | पुढारी

नाशिक : अवकाळीमुळे जिल्ह्यात साडेपाच हजार हेक्टरचे नुकसान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जुन्या पेन्शनसाठी संपावर गेलेल्या तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांनी शेतकर्‍यांप्रति मदतीचा हात पुढे करत बांधावर जाऊन नुकसानीचे आकडे घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे चार दिवसांपासून ठप्प असलेल्या पीकपंचनाम्यांच्या कामाला गती मिळाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे सुमारे 5 हजार हेक्टरवरील पिकांचे प्राथमिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

गेल्या आठवडाभरापासून जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी जिल्ह्यातील शासकीय कर्मचार्‍यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. या संपात तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकही सहभागी झाल्याने गावस्तरावर सर्वच कामे ठप्प झाली आहेत. अशा परिस्थितीत अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसानीच्या पंचनाम्यांची कामे रखडल्याने शेतकर्‍यांमध्ये तीव्र नाराजी आहे. अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका निफाड, नाशिक, येवला, नांदगाव, सुरगाणा, पेठ व कळवण या तालुक्यांना बसला आहे. या तालुक्यांत दि. 5 ते 14 मार्च याकाळात 515 हेक्टर क्षेत्र बाधित झाले, तर दि. 15 ते 17 मार्च या तीन दिवसांच्या कालावधीत तब्बल 3,036 हेक्टरवरील रब्बी पिके मातीमोल झाली आहेत. याशिवाय रविवारी (दि. 19) निफाड व पेठ तालुक्यांत झालेल्या गारपिटीने सुमारे 2 हजार हेक्टरचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. त्यामुळे दि. 5 ते 19 मार्च या काळात एकूण आढावा घेतल्यास सुमारे साडेपाच हजार हेक्टरवरील गहू, कांदा, हरभरा, द्राक्ष, भाजीपाल्यासह अन्य शेतीपिकांना फटका बसला आहे. नुकसानीचे पंचनामे तत्काळ पूर्ण करत मदतीची मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे. अवकाळी व गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांच्या मदतीसाठी तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवक धावून आले आहेत. शेतकर्‍यांचे झालेले नुकसान बघता संप काळातही पिकांचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचा निर्णय या तिन्ही घटकांनी घेतला आहे. रविवार (दि.19) पासूनच त्यांनी बांधावर जाऊन माहिती घेण्यास सुरुवात केल्याने पीडित शेतकर्‍यांना काहीसा दिलासा वाटत आहे.

आज अंतिम अहवाल शक्य
तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहायकांच्या संघटनांची बैठक होऊन त्यामध्ये पीकपंचनामे करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, पंचनाम्यांचे काम करताना कोणत्याही परिस्थितीत कार्यालयात न जाण्याचा निर्धारही करण्यात आला आहे. मंगळवारी (दि. 21) सायंकाळपर्यंत अंतिम नुकसानीचे आकडे हाती येऊ शकतात, अशी माहिती नाशिकचे अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधी यांनी दिली आहे.

हेही वाचा:

Back to top button