मावळात आढळला दुर्मिळ लालकंठी तिरचिमणी; पक्षी वैभवात अजून एक मानाचा तुरा | पुढारी

मावळात आढळला दुर्मिळ लालकंठी तिरचिमणी; पक्षी वैभवात अजून एक मानाचा तुरा

तळेगाव दाभाडे : जागतिक चिमणी दिनाच्या दिवशी मावळच्या पक्षी वैभवात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला असून, एक दुर्मिळ पक्षाचे दर्शन झाले आहे. या पक्षाचे नाव लालकंठी तिरचिमणी किंवा लालकंठी चरचरी आहे. हा पक्षी उत्तर युरोप आणि पेलीआर्कर्टिक व उत्तरीय अलास्का भागातील एक चिमणी कुळातील पक्षी आहे.

वलवण धरणाच्या बॅक वॉटरमध्ये पक्षीप्रेमींना हा पक्षी दिसला आहे. हा एक खूप लांब स्थलांतर करणारा पक्षी असून, हिवाळ्यात आफ्रिका, दक्षिण व पूर्व आशिया आणि अमेरिकेकडील पश्चिमी समुद्रकिनारी स्थलांतर करतो. भारतात हा पक्षी कधी कधी अंदमान बेटावर आढळतो. मार्चच्या शेवटच्या आठड्यात परतीच्या प्रवासाला सुरुवात हा पक्षी आकाराने साधारण चिमणीपेक्षा थोडा मोठा आणि परीट पक्षीसारखा असतो. याचे खाद्य गवतावरील छोट-छोटे कीटक व आळ्या आहेत.

प्रजनन पूर्व काळात या पक्षाच्या चेहर्‍यावर व गळ्याभोवती लालसर तपकिरी रंग येतो म्हणून याचे नाव लालकंठी तिरचिमणी किंवा लालकंठी चरचरी असे पडले आहे. हे पक्षी साधारणपणे मार्च महिन्याच्या शेवटच्या आठड्यात परतीच्या प्रवासाला सुरुवात करतात.
तळेगाव दाभाडे येथील निसर्गमित्र, पक्षी अभ्यासक व नामवंत वन्यजीव छायाचित्रकार अभय तुळशीराम केवट यांना मावळ भागात या दुर्मिळ पक्षाचे दर्शन झाले.

मार्च महिन्यात पहिल्या आठवड्यात हा पक्षी अभय केवट यांना दिसला. त्याची अचूक ओळख पटवण्याकरिता त्यांनी साधारण 20 दिवस त्या पक्षाचे निरीक्षण केले व त्याचे अधिवास आणि त्याचे वर्तन याचा अभ्यास करून त्या पक्षाची नेमकी प्रजाती ओळखून काढली.
या पक्षाचे दर्शनामुळे पक्षीप्रेमी व पक्षीअभ्यासक यांच्यात उत्साही वातावरण आहे.

लालकंठी तिरचिमणी या पक्षाची पुणे जिल्हा व पश्चिम घाटातील भागात प्रथमच नोंद झाली आहे. या आधी महाराष्ट्र राज्यात फक्त 2 वेळा तो आढळून आला असल्याचे केवट यांनी सांगितले. या पक्षी दर्शनाने एक गोष्ट निदर्शनात येते की मावळातील पक्षी संपदा अजूनही टिकून आहे आणि अजूनही मावळ हा वन्यजीव आणि दुर्मिळ पक्षींचे स्वर्गच आहे असे याने सिध्द होते.

                               – अभय केवट, पक्षीप्रेमी

Back to top button