पिंपळनेर : इंडियन ऑइल कंपनीच्या पाईपलाईनला शेतकऱ्यांचा विरोध | पुढारी

पिंपळनेर : इंडियन ऑइल कंपनीच्या पाईपलाईनला शेतकऱ्यांचा विरोध

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील महूखड येथे इंडियन ऑइल कार्पोरेशन कंपनीची पाईपलाईनचे काम सुरू असताना योग्य भरपाई न मिळाल्याने तेथील आदिवासी शेतकऱ्यांनी या कामाला विरोध केला. यावेळी कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून सुमारे २० शेतकऱ्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणण्यात आले. त्यानंतर कलम ६८ व ६ नुसार कारवाई करून सोडून देण्यात आले.

शेतकऱ्यांच्या आंदोलनाप्रसंगी माजी खा. बापू चौरे, आदिवासी संघटनेचे नेते डॉ. विशाल वळवी, तहसीलदार प्रवीण चव्हाणके, सहायक पोलीस निरीखक सचिन साळुंखे यांनी घटनास्थळी धाव घेत कामासंदर्भात माहिती जाणून घेतली. पेसा कायदा अंतर्गत शेतजमिनीला मोबदला मिळाला हवा, अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.  दिल्लीच्या शेडयुल ड्राईव्ह फाईंडिंग कमिटीने यासंदर्भात संबंधित महसूल यंत्रणेकडे तसा अहवालही पाठवला आहे. झालेल्या बैठकीत काही आदिवासी शेतकरी एकत्र येत त्यांनी कंपनीच्या विरोधात तीव्र रोष व्यक्त केला. जमिनीचा पंचनामा नसतांना कंपनीने गावात येऊन तशा प्रकारच्या नोटिसा का चिकटवल्या? असा संतप्त सवाल या शेतकऱ्यांनी केला आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी शेतकऱ्यांना ताब्यात घेत अटक करून सुटका केली. यावेळी डॉ. वळवी यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाला न्याय मिळावा, यासाठी आगामी होणाऱ्या सर्व प्रकारच्या निवडणुकांवर आदिवासी समाज एकजुटीने बहिष्कार घालणार असल्याचे सांगितले. दरम्यान, औरंगाबाद खंडपीठात महसूलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कंपनीच्या अधिकाऱ्यांवर कंपनीविरोधात रिट पिटीशन दाखल करण्यात आल्याचे डॉ. वळवी यांनी सांगितले. पेसा कायद्याची अंमलबजावणी होऊन शेतकऱ्यांना न्याय मिळायला हवा असे, यावेळी विशाल वळवी यांनी यावेळी स्पष्ट केले. रात्री उशिरापर्यंत आदिवासी शेतकऱ्यांसमवेत माजी खा. बापू चौरे व डॉ. विशाल वळवी यांच्यासमवेत चर्चा सुरू होती तर शेतकऱ्यांनी जमिनीचा मोबदला मिळण्याची मागणी लावून धरली.

हेही वाचा:

Back to top button