पुणे : आयुष्यात खेळाचा अंतर्भाव गरजेचा : डॉ. नवनीत मानधनी | पुढारी

पुणे : आयुष्यात खेळाचा अंतर्भाव गरजेचा : डॉ. नवनीत मानधनी

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  प्रत्येक तरुणांच्या आयुष्यामध्ये खेळाचा अंतर्भाव असणे गरजेचे आहे. खेळामध्ये यश आणि अपयश ठरलेले असते. त्यामुळे यशाने हुरुळ जाऊ नये, तर अपयशाने खचून जाऊ नये. अपयश कशामुळे आले, याचा प्रत्येक खेळाडूंनी विचार करावा. दै. ‘पुढारी’ च्या वतीने फक्त महिलांसाठी स्पर्धा आयोजित केल्या असून, नियोजनही सुंदर असल्याचे प्रतिपादन अ‍ॅम्बिशियस अ‍ॅकॅडमीचे संस्थापक डॉ. नवनीत मानधनी यांनी व्यक्त केले.  दै. ‘पुढारी’ आयोजित ‘राईज अप’ महिलांच्या बॅडमिंटन स्पर्धेचे पारितोषिक वितरण पी. ई. सोसायटीज मॉडर्न पीडीएमबीए स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, शिवाजीनगर येथे करण्यात आले.

त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीच्या घोले रोड शाखेच्या उपव्यवस्थापक तृप्ती शेळके, दै. ‘पुढारी’ चे मार्केटिंग विभाग प्रमुख आनंद दत्ता, दै. ‘पुढारी’ चे पुणे मार्केटिंग प्रमुख संतोष धुमाळ, हरिश हिंगणे, सागर सप्रे यांसह मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी-चिंचवड या ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात स्पर्धक सहभागी झाले होते.

शेळके म्हणाल्या, ‘दै. ‘पुढारी’ च्या वतीने केवळ एक-दोन स्पर्धा न भरवता तब्बल 8 खेळांच्या स्पर्धा भरविलेल्या आहेत. या स्पर्धासुद्धा केवळ महिलांसाठी असून, महिलांना दै. ‘पुढारी’ ने मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. दै. ‘पुढारी’चा उपक्रम खूपच कौतुकास्पद असून, त्यामध्ये सातत्य ठेवावे.’ या स्पर्धा मुख्य प्रायोजक ऑक्सिरीच, हेल्थ पार्टनर डॉ. ऑर्थो, अ‍ॅकॅडमिक पार्टनर सूर्यदत्ता एज्युकेशन इन्स्टिट्यूट, फायनान्शियल पार्टनर लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटी, मीडिया पार्टनर झी टॉकीज या सर्व प्रायोजकांच्या सहकार्याने सुरू आहेत.

Back to top button