NASA’s Orion SpaceCraft : ‘ओरियन’ने टिपली चंद्राच्या पृष्ठभागावरील विवरे | पुढारी

NASA’s Orion SpaceCraft : ‘ओरियन’ने टिपली चंद्राच्या पृष्ठभागावरील विवरे

वॉशिंग्टन ः पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह असलेल्या चंद्रावर माणसाचे अनेक वेळा पाऊल पडलेले आहे. मात्र, ‘अपोलो’ मोहिमांनंतर गेल्या 50 वर्षांच्या काळात माणूस चंद्रावर गेलेला नाही. आता अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’च्या ‘आर्टेमिस’ मोहिमेतून भविष्यात हे घडू शकते. नुकतेच ‘नासा’ने ‘आर्टेमिस-1’ मोहीम राबवली व त्यामध्ये ‘ओरियन’ हे यान चंद्राजवळ सोडले. ( NASA’s Orion SpaceCraft ) आता या ओरियन अंतराळयानाने चंद्राची अनेक वर्षांनी प्रथमच अत्यंत जवळून छायाचित्रे टिपली आहेत. त्यामध्ये चंद्राच्या पृष्ठभागावरील विवरे स्पष्ट दिसत आहेत.

NASA’s Orion SpaceCraft : ‘आर्टेमिस’ या मानवी चांद्रमोहिमेचा पहिला टप्पा

‘ओरियन’ हे यान नुकतेच ‘नासा’ने आपल्या सर्वात शक्तिशाली रॉकेट ‘स्पेस लाँच सिस्टीम’द्वारे चंद्राच्या दिशेने पाठवले होते. ते ‘आर्टेमिस-1’ मोहिमेचा भाग असून, हा ‘आर्टेमिस’ या मानवी चांद्रमोहिमेचा पहिला टप्पा आहे. ओरियनच्या ऑप्टिकल नेव्हिगेशन सिस्टीमने ही छायाचित्रे टिपली आहेत. ‘नासा’च्या इन्स्टाग्राम पोस्टच्या माहितीनुसार, ही यंत्रणा पृथ्वी व चंद्राचे वेगवेगळ्या अंतरावरून व ठिकाणांवरून छायाचित्र काढण्यास सक्षम आहे; पण ही छायाचित्रे कलर नव्हे तर ब्लॅक अँड व्हाईट असतात. पोस्टमध्ये चंद्राच्या 4 भागांची छायाचित्रेही शेअर करण्यात आली आहेत. 1975 च्या अपोलो मोहिमेनंतर प्रथमच चंद्राचे असे जवळून फोटो काढण्यात आले आहेत.

यान 20 लाख 92 हजार 147 कि.मी.चे अंतर पार करणार

‘नासा’ची ‘आर्टेमिस-1’ ही प्रमुख मोहिमेची एक टेस्ट फ्लाईट आहे. याद्वारे ‘नासा’च्या महत्त्वकांक्षी अपोलो मोहिमेचे स्मरण होत आहे. आपल्या पोस्टमध्ये ‘नासा’ने ओरियन अंतराळ यान अपोलो 11, 12 व 14 मोहिमेच्या लँडिंग साईटस्वरून उड्डाण केल्याचे सांगितले. 50 वर्षांनंतर प्रथमच एखादे स्पेस कॅप्सूल चंद्राभोवती घिरट्या मारत आहे. सद्यस्थितीत त्यात एकही अंतराळवीर पाठवण्यात आला नाही. मोहीम 25 दिवस, 11 तास व 36 मिनिटांची आहे. त्यानंतर 11 डिसेंबर रोजी हे यान पॅसिफिक समुद्रात कोसळेल. तोपर्यंत हे यान एकूण 20 लाख 92 हजार 147 कि.मी.चे अंतर पार करेल.

मोहिमेचे आहेत तीन टप्पे

अमेरिका 53 वर्षांनंतर पुन्हा एकदा आर्टेमिस मिशनद्वारे चंद्रावर मानव पाठवण्याच्या तयारीत आहे. या मोहिमेचे 3 टप्पे आहेत. आर्टेमिस-1, 2 व 3. आर्टेमिस-1 चे रॉकेट चंद्राच्या कक्षेत जाईल, काही छोटे उपग्रह सोडेल व नंतर स्वतःच कक्षेत स्थापित होईल. 2024 च्या आसपास आर्टेमिस-2 लाँच करण्याची योजना आहे. यात काही अंतराळवीरही जातील; पण ते चंद्रावर पाय ठेवणार नाहीत. चंद्राच्या कक्षेत घिरट्या घालून ते परत येतील. या मोहिमेचा कालावधी जास्त असेल. त्यानंतर आर्टेमिस-3 ही शेवटची मोहीम रवाना होईल. त्यात जाणारे अंतराळवीर चंद्रावर उतरतील. हे मिशन 2025 किंवा 2026 मध्ये लाँच केले जाऊ शकते. पहिल्यांदाच महिलाही मानवी मून मिशनचा भाग असणार आहेत. त्यात पर्सन ऑफ कलर (पांढर्‍यापेक्षा वेगळ्या वंशाची व्यक्ती) देखील क्रू मेंबर असेल. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर असलेले पाणी व बर्फावर हे अंतराळवीर संशोधन करतील.

हेही वाचा : 

Back to top button